रजत ओसवाल आणि डॉ. नम्रता सिंग मोहिमेच्या कालावधीत देणार सामाजिक संदेश
कोल्हापूर, १८ डिसेंबर – कोल्हापूर हे नेहमी आगळं-वेगळं काहीतरी करण्यासाठी ओळखले जाते. येथील रजत ओसवाल हे त्यांच्या स्वत: रिक्शातून बेंगळुरूच्या डॉ. नम्रता सिंग यांच्यासह संपूर्ण उत्तर भारताच्या मोहिमेवर जाणार आहेत. उत्तर भारत हा हिमालयाच्या पर्वतरांगांनी नटलेला आहे. आजपर्यंत सायकल किंवा बुलेट अशा विविध माध्यमांतून अनेकांनी साहसी प्रवास केलेला आहे; पण रिक्शातून प्रवास करणे ही पहिलीच घटना आहे. याचा प्रारंभ कोल्हापुरातील न्यू पॅलेस, कसबा बावडा येथून २० डिसेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता होणार आहे, अशी माहिती रजत ओसवाल यांनी १८ डिसेंबर या दिवशी ‘प्रेसक्लब’ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी रजत ओसवाल म्हणाले
१. ही ३० दिवसांची विशेष मोहीम असून यात पुणे-मुंबई-सूरत-वडोदरा-उदयपूर-अजमेर- जयपूर- आग्रा- नवी देहली- शिमला- मनाली- धर्मशाला- डलहौसी- अमृतसर- चंदीगढ- देहली- आग्रा- झाशी- भोपाळ- इंदूर- नाशिक- पुणे या मार्गांवरून ५ सहस्र किलोमीटरचा प्रवास होणार आहे.
२. या प्रवासाच्या कालावधीत ‘स्तनाचा कर्करोग’ आणि पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी ‘एक झाड लावा, एक झाड वाचवा’ या दोन समस्यांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
३. या मोहिमेसाठी सर्व साधनांनी युक्त अशी विशेष रिक्शा सिद्ध करण्यात आली असून यासाठी लागणार्या सर्व अनुमतीही घेण्यात आल्या आहेत.