निर्यातक्षम आंबा बागांची ‘हॉर्टीनेट’द्वारे ‘मँगोनेट’ या संगणकीय प्रणालीवर नोंदणी करा ! – विभागीय कृषी सह संचालकांचे आवाहन

सिंधुदुर्ग  – निर्यातक्षम आंबा बागांची ‘हॉर्टीनेट’द्वारे मँगोनेट या संगणकीय प्रणालीवर नोंदणी ३१ मार्च २०२१ पर्यंत करता येणार असून संबंधित आंबा बागायतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे.

युरोपियन युनियन आणि अन्य देशांना आंबा निर्यातीकरिता कृषी अन् प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या (APEDA) मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा असणार्‍या आंबा बागांची नोंदणी केली जाते. कोकण विभागात वर्ष २०१९-२० मध्ये ७ सहस्र ९४४ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झाली आहे. अपेडाद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी ऑनलाईन नोंदणी प्रणाली १ डिसेंबर २०२० पासून कार्यान्वित करण्यात आली असून याचे अर्ज ‘मोबाईल अ‍ॅप’द्वारे उपलब्ध केले आहेत. निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी ५ वर्षांसाठी वैध असेल. त्यामुळे गतवर्षी नोंदणी केलेल्या आंबा बागांची नव्याने नोंदणी किंवा नूतनीकरण करण्याची आवश्यकता नाही. नव्याने नोंदणी करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, तसेच ७/१२, ८-अ, बागेचा नकाशा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. कोकण विभागातील सर्व आंबा बागायतदारांनी नोंदणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी साहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.