|

वॉशिंग्टन (अमेरिका) – मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार तहव्वूर राणा (वय ६४ वर्षे) याला अमेरिकेने भारताच्या कह्यात दिल्यानंतर अमेरिकेच्या न्याय विभागाने गंभीर माहिती दिली आहे. या आक्रमणानंतर तहव्वूर याने या आक्रमणातील त्याचा साथीदार डेव्हिड हेडली याला म्हटले होते की, ‘भारतियांवर आक्रमणे होणे योग्य आहे. ते त्याच लायकीचे आहेत.’ इतकेच नाही, तर या आक्रमणात ठार झालेल्या ९ आतंकवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान ‘निशान-ए-हैदर’ देण्यात यावा, अशी त्यांची इच्छा होती. युद्धात हुतात्मा झालेल्या पाकिस्तानी सैनिकांना हा सर्वोच्च सन्मान दिला जातो.
तहव्वूर राणा याच्या चौकशीच्या वेळी त्याच्या आणि डेव्हिड हेडली यांच्यामधील संभाषणात ही माहिती राणा याने सांगितली होती. तहव्वूर याला भारतात आणण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची १८ दिवसांची कोठडी दिली आहे.