छत्रपती संभाजीनगर येथे हनुमान मंदिरात चोरीचा प्रयत्न : मूर्तीची विटंबना !

पोलिसांकडून पहाणी, नागरिकांनी मूर्तीची केली प्राणप्रतिष्ठा !

छत्रपती संभाजीनगर – संपूर्ण शहरात हनुमान जयंतीची जय्यत सिद्धता चालू असतांना भावसिंगपुरा परिसरातील पाटील खोर्‍यातील चिरीखाना हनुमान मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला, तसेच चोराने हनुमानाच्या मूर्तीची विटंबना केली. पुजार्‍याकडून घटनेची माहिती मिळताच या भागातील नागरिक आणि पोलीस हे घटनास्थळी पोचले. त्यांनी श्री हनुमानाच्या मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करून आरती केली. छावणी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. ही घटना ११ एप्रिल या दिवशी घडली.

१२ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीच्या निमित्ताने या मंदिरात मोठा उत्सव आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारनंतर या कार्यक्रमाची सिद्धता चालू असतांना हा प्रकार उघडकीस आला. घडलेला प्रकार हा मूर्तीचे चांदीचे डोळे चोरण्याच्या उद्देशाने झाला असावा, असे पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणात समोर आले आहे. घटना घडताच मंदिराच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार संजय केणेकर यांनी मंदिरास भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत १२ एप्रिल या दिवशी महाआरती करण्यात आली.

संपादकीय भूमिका

पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे हिंदूंच्या मंदिरांत चोरी, तसेच मूर्तींची विटंबना यांसारखे प्रकार होणे लज्जास्पद आहे !