आम्ही ‘वक्फ कायदा १९९५’ला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देणार ! – Advocate Vishnu Shankar Jain

अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची घोषणा

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

छिंदवाडा (मध्यप्रदेश) – वक्फ बोर्डाशी संबंधित प्रकरणाची सुनावणी येत्या १६ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे, ज्यामध्ये आम्हीही सहभागी होऊ. वक्फ बोर्डाला अजूनही काही अमर्याद अधिकार आहेत आणि काही प्रावधाने (तरतुदी) अजूनही घटनाविरोधी आहेत. या संदर्भात आम्ही ‘वक्फ कायदा १९९५’ला आव्हान देणार आहोत, अशी माहिती सर्वाेच्च न्यायालयातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.

अधिवक्ता जैन पुढे म्हणाले की, आम्ही वक्फ सुधारणा कायदा २०२५ च्या अनेक तरतुदींना पूर्ण पाठिंबा देतो. हा एक अतिशय चांगला आणि प्रभावी कायदा आहे. ज्या तरतुदींमध्ये अजूनही सुधारणा आवश्यक आहेत. त्यांच्याकडे आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधू.

भाजप वक्फ कायद्यातील सुधारणांचा लाभ सांगण्यासाठी जनजागृती मोहीम चालू करणार

वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात देशात मुसलमान संघटना सतत आंदोलन करत आहेत. त्याच वेळी भाजप या कायद्याचे लाभ सांगण्यासाठी आणि विरोधकांच्या टीकेला तोंड देण्यासाठी २० एप्रिलपासून पंधरवड्यासाठी जनजागृती मोहीम चालू करणार आहे. विशेष करून मुसलमानांना याविषयी माहिती दिली जाणार आहे.

संपादकीय भूमिका

जे सरकारला करायला हवे, त्यासाठी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना न्यायालयाचे दार ठोठवावे लागत आहे. वक्फ कायद्यात सुधारणा करून वक्फ बोर्डाच्या मनमानीवर लगाम लावणे पुरेसे नाही, तर हा कायदाच रहित करणे, हा योग्य उपाय आहे !