Tulsi Gabbard On EVM : अमेरिकेतील मतदान इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे नाही, तर मतपत्रिकेद्वारे व्हावे !

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका तुलसी गॅबर्ड यांची मागणी

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका तुलसी गॅबर्ड

वॉशिंग्टन (अमेरिका) – निवडणूक निकालांमध्ये फेरफार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम्) सहजपणे ‘हॅक’ (नियंत्रण मिळवणे) केली जाऊ शकतात. म्हणूनच मतदारांना निवडणुकीच्या पारदर्शकतेवर विश्वास ठेवण्यासाठी संपूर्ण अमेरिकेत कागदी मतपत्रिका लागू करण्याची आवश्यकता आहे, असे विधान अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका तुलसी गॅबर्ड यांनी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत केले. गॅबर्ड यांच्या विधानानंतर अमेरिकेत वाद चालू झाला आहे. अनेकांनी याचे समर्थन केले, तर अनेकांनी विरोध केला आहे. यापूर्वीच अमेरिकेतील उद्योगपती इलॉन मस्क यांनीही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर टीका करत ते रहित करण्याची मागणी केली होती.

गॅबर्ड यांच्या विधानाच्या एक दिवस आधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वर्ष २०२० च्या निवडणुकीत माजी सायबर सुरक्षा प्रमुख क्रिस क्रेब्स यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे निर्देश देणारा कार्यकारी आदेश न्याय विभागाला दिला होता.

काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न !

काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ‘एक्स’वर लिहिले की, अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका गॅबर्ड यांनी ईव्हीएम् हॅकिंगचे सूत्र सार्वजनिकरित्या उपस्थित केले आहे. मतदानाच्या निकालांमध्ये फेरफार करण्यासाठी ईव्हीएम असुरक्षित असतात. मुख्य निवडणूक आयुक्त या प्रकरणात गप्प का आहेत ? पंतप्रधान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आणि भाजप गप्प का आहेत ? निवडणूक आयोग आणि मोदी सरकारने ईव्हीएम् ‘हॅकिंग’विषयी सर्व तपशील गोळा करण्यासाठी आणि ईव्हीएम्मधील त्रुटींच्या आधारे आमच्या ईव्हीएम्ची तपासणी करण्यासाठी अमेरिकी सरकार आणि गॅबर्ड यांच्याशी संपर्क साधू नये का ? सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून नोंद घ्यावी, अशी मागणी केली आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यातील यंत्रांमध्ये भेद ! – निवडणूक आयोग

तुलसी गॅबर्ड यांनी अमेरिकी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर, भारतीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, आतापर्यंत झालेल्या मतदानात ५ कोटींहून अधिक व्हीव्हीपॅटची (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल – मतदार पडताळणीयोग्य पेपर ऑडिट ट्रेल) पुष्टी झाली आहे, जे ईव्हीएम् मतांशी जुळतांना बरोबर आढळले आहेत. भारतीय ईव्हीएम् आणि इतर देशांच्या ईव्हीएम यांमध्ये भेद आहेत.

अ. आमच्या ईव्हीएम्मध्ये ऑपरेटिंग सिस्टम नाही. अमेरिकी यंत्र ‘विंडोज’ किंवा ‘लिनक्स’वर (संगणकीय प्रणालीवर) चालते.

आ. भारतातील ईव्हीएम् पूर्णपणे ऑफलाईन आहे. यात ‘वाय-फाय’ किंवा ‘ब्लूटूथ’ (बिनतारी संपर्क यंत्रणा) नाही. अमेरिकी यंत्र इंटरनेटशी जोडलेल्या आहेत.

इ. एकदा आपल्या ईव्हीएममध्ये प्रोग्राम केले की, ते पालटता येत नाही. अमेरिकी यंत्रात पालट करणे शक्य आहे.

ई.  आमच्या यंत्रामधील बटण दाबल्यानंतर पुष्टीकरणासाठी एक प्रत (स्लिप) छापली जाते. अमेरिकी यंत्रात हे घडत नाही.