Amit Shah Visit Raigad Fort : छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या शिवपुण्यतिथी अभिवादन सोहळा !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

रायगड – छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी आहे. मी शिवचरित्र वाचले आहे. जिजाऊमातेने छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ जन्म दिला नाही, तर स्वराज्य, स्वधर्म आणि भाषा यांचा पुनरुद्धार करण्याची प्रेरणाही दिली. बाल शिवाजीला समग्र देशाला एकत्र आणि स्वतंत्र करण्याचा विचार दिला, तसेच हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची प्रेरणाही दिली. त्यामुळेच मी माँसाहेबांना अभिवादन करत आहे. शिवचरित्र प्रत्येक भारतियाला, प्रत्येक मुलाला शिकवले पाहिजे. छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका, अशी मी हात जोडून विनंती करतो. देश आणि जगही त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या शिवपुण्यतिथी अभिवादन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सर्व खासदार-आमदार आदी नेते उपस्थित होते.

ते म्हणाले,…

१. मी येथे अनेक वर्षांनंतर आलो आहे. सिंहासनाला अभिवादन करतांना माझ्या मनातील भाव मी व्यक्त करू शकत नाही. ज्याने स्वधर्म, स्वराज्य आणि मरण यांची जिगविषा (जीवन जगण्याची इच्छा) निर्माण केली, त्यांच्या सभेत मी आज उभा आहे. हे वर्णन मी शब्दांत सांगू शकत नाही.

२. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, तेव्हा देशातील जनता अंधकारात होती. कुणाच्या मनात स्वराज्याची कल्पनाही येऊ शकत नव्हती. दक्षिणेचेही पतन झाले. त्यामुळे स्वराज्य आणि स्वधर्म हे लोकांना गुन्हा वाटू लागले; पण १२ वर्षांच्या मुलाने सिंधुपासून कन्याकुमारीपर्यंत भगवा फडकवण्याची शपथ घेतली.

३. मी अनेक नायकांचे जीवन चरित्र वाचले; पण दुर्दम्य इच्छाशक्ती, मोठी रणनीती आणि ती यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व लोकांना एकत्र करून केवळ शिवरायांनी अपराजित सैन्य उभारले.

४. अटक ते कटक, तसेच बंगालपर्यंत छत्रपतींचे मावळे गेले. दक्षिणेत कर्नाटकापर्यंतही गेले. तेव्हा ‘देश आता स्वतंत्र होईल’, असे लोकांना वाटले. देश वाचला, भाषा वाचल्या. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर आपण जगात मान वर करून उभे राहू शकतो.

५. स्वधर्माचा अभिमान, स्वराज्याची आकांक्षा आणि स्वभाषेला अमर बनवणे हे ३ विचार देशाच्या सीमेशी संबंधित नाहीत. मानवी जीवनाच्या स्वाभिमानाशी जोडलेले आहेत. ते शिवरायांनी हे विचार जगासमोर ठेवले. जेव्हा आक्रमकांनी आपल्यावर सत्ता गाजवली, गुलामीची मानसिकता रोवली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे विचार दिले.

६. आपण रायगडावरून संकल्प करत आहोत की, जेव्हा आपल्या स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील, तेव्हा भारत देश जगात पहिल्या क्रमांकावर असेल.

७. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर औरंगजेब आला; पण तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, ताराराणी, संताजी आणि धनाजी यांनी लढा देऊन त्याची कबर येथेच बांधली.

८. रायगडाला केवळ पर्यटनस्थळ नव्हे, तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे. इयत्ता सातवीपासून ते बारावीपर्यंतचा प्रत्येक विद्यार्थी एकदातरी या प्रेरणास्थळावर आला पाहिजे.

राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांना शिक्षा करण्यासाठी कायदा करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांना शिक्षा करण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाणित इतिहास शासनाकडून प्रसिद्ध करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली. ते म्हणाले की खासदार उदयनराजे यांनी काही मागण्या केल्या होत्या. छत्रपतींचा अपमान करणार्‍यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. खरेतर त्यांना टकमक टोकावरूनच लोटले पाहिजे; परंतु आज आपण लोकशाही रहातो. त्यामुळे त्यासंदर्भात नियम बनवण्याचे काम करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय आता सर्वोच्च न्यायालयातून उच्च न्यायालयात आला आहे. आम्ही उच्च न्यायालयात या प्रकरणी लढा देऊन स्मारक उभारण्याच्या मागणीत यश मिळवू.

संपूर्ण भारतात शिवरायांमुळे भगव्याचे राज्य !

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आपण कुणीच नसतो; कारण आपल्यातील तेज जागवण्याचे काम शिवरायांनी केले. अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून त्यांनी आपल्यामधील तेज जागृत केले. मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापन केली. संपूर्ण भारतात केवळ शिवाजी महाराजांमुळे भगव्याचे राज्य आले.

छत्रपती शिवरायांमुळेच आपले अस्तित्व आहे ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराज यांना तसे फार मोठे आयुष्य लाभले नाही. आणखी २० ते ३० वर्षे महाराज असते, तर देशाचा इतिहास पालटला असता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. ते बांधले नसते, तर आपण आजही गुलामगिरीमध्ये खितपत पडलो असतो. छत्रपती शिवरायांमुळेच आपले अस्तित्व आहे, हे कुणाला विसरता येणार नाही. शिवरायांनी हाती तलवार घेतली; पण निष्पाप लोकांच्या रक्ताने ती रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही, तर मानवतेचा सुगंध येतो.

३७० कलम हटवणे, वक्फ बोर्ड विधेयकाच्या वेळी केलेले भाषण, अतिरेक्यांचा केलेला बीमोड, आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार तहव्वूर राणा याला भारतात आणणे या कृतींसाठी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांचे कौतुक केले.