Indian Embassy In Melbourne Vandalized : मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथील भारतीय दूतावासाची अज्ञातांकडून तोडफोड

प्रवेशद्वारावर लिहिल्या आक्षेपार्ह घोषणा

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – येथील भारतीय दूतावासाची १० एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंतीवर आक्षेपार्ह घोषणा लिहिण्यात आले. या घटनेनंतर कॅनबेरा येथील भारतीय उच्चायुक्तालयाने ऑस्ट्रेलियाच्या सरकारी अधिकार्‍यांकडे हे सूत्र उपस्थित केले. यापूर्वी या दूतावासावर अशा प्रकारच्या आक्रमणाच्या घटना घडल्या आहेत.

(म्हणे) ‘लोकांकडे काही माहिती असेल, तर ती आम्हाला द्या !’ – पोलीस

या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांनी लोकांना आवाहन केले आहे की, जर कुणाकडे या घटनेविषयी काही माहिती असेल, तर त्यांनी पुढे येऊन ती द्यावी. (ऑस्ट्रेलियातील पोलीस जाणीवपूर्वक अशा घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत. यापूर्वी हिंदूंच्या मंदिरांवर झालेल्या आक्रमणांच्या प्रकरणीही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. येथे खलिस्तानी लोक हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत ! – संपादक)

दूतावासांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत !  – भारतीय उच्चायोग

या घटनेविषयी भारतीय उच्चायोगाने ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, ऑस्ट्रेलियातील भारतीय राजदूत आणि वाणिज्य दूतावास यांच्या इमारती अन् कर्मचारी यांच्या सुरक्षिततेची निश्चिती करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत.

आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न ! – ऑस्ट्रेलियातील भारतीय

या घटनेवर येथील भारतीय नागरिकांनी सांगितले की, या केवळ भिंतीवरील खुणा नाहीत, तर हा भारतियांना घाबरवण्याचा प्रयत्न आहे.

हिंदूंच्या मंदिरांवरही झाली आहेत आक्रमणे

वर्ष २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियातील अनेक मंदिरांमध्ये तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. ब्रिस्बेनमधील श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या भिंतीची तोडफोड करण्यात आली होती. तसेच मंदिराच्या भिंतीवर खलिस्तानच्या समर्थनार्थ आणि भारताविरुद्ध घोषणा लिहिण्यात आल्या. यापूर्वी मेलबर्न येथे एका हिंदु मंदिरावर आक्रमण करून त्यावर खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.

संपादकीय भूमिका

येथे यापूर्वी खलिस्तान समर्थकांनी तोडफोड केली असल्याने त्यांच्याकडून आताही तोडफोड करण्यात आल्याचे लक्षात येते. ऑस्ट्रेलियातील सरकार खलिस्तान समर्थकांवर कठोर कारवाई करत नसल्याचाच हा परिणाम आहे !