‘८.४.२०२० या दिवशी हनुमान जयंतीला सायंकाळी संगीत सेवेचा आढावा झाल्यानंतर आम्ही सर्व साधिकांनी एक भावप्रयोग केला. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत मानसरित्या जाऊन आपल्याला त्यांच्या समक्ष आत्मनिवेदन करण्याची संधी मिळाली आहे आणि आपण आपल्या मनातील भाव त्यांच्या चरणी आत्मनिवेदन करायचे’, असा तो भावप्रयोग होता. त्या वेळी मी डोळे बंद करून भावप्रयोग करू लागल्यावर मी मानसरित्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीच्या जवळ जाऊन थांबले आणि
‘रामा तुझ्या द्वारी पसरीतो करा ।
भक्ती भीक घाला दीनांच्या दयाळा ॥’
असे भजन भावाश्रूंसहीत म्हणत खोलीचे दार उघडले. मी आत गेल्यावर बघते, तर परात्पर गुरुदेव तेथे नव्हतेच. ते मला दिसले नाहीत. मला संपूर्ण खोलीत केवळ प्रकाशच दिसला. ‘तो प्रकाश म्हणजे परात्पर गुरुदेवच आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी मी त्या प्रकाशासमोर नतमस्तक होऊन याचना करत ‘प्रभो, मज एकच वर द्यावा । या चरणांच्या ठायी माझा निश्चल भाव रहावा ॥’ हे गीतरामायणातील गीत भावाश्रूंसह म्हणत होते. त्यानंतर ‘गुरुवर माझ्या स्वप्नी आले’, या भजनाचे शेवटचे कडवे
‘हवे काय तुज मजसी वदले ।
काय मागू मज काही न सुचले ।
गहिवरूनी मी चरण धरीयले ।
गुरुचरणासी वंदन केले ॥’
आठवून माझा भाव पुष्कळ जागृत झाला. त्यानंतर मी सेवेच्या ठिकाणी परत आले. तेव्हा मला भावप्रयोग करत असलेल्या सर्व साधिकांच्या हृदयात परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्मित हास्य करणार्या रूपाचे दर्शन झाले. परात्पर गुरु डॉक्टरांनी एकाच वेळी सगुण अन् निर्गुण (साधिकांच्या हृदयात सगुण आणि खोलीत प्रकाश रूपात निर्गुण) या दोन्ही दर्शनांची प्रचीती देऊन ‘सगुण-निर्गुण नाही भेदाभेद ।’ याची मला अनुभूती दिली. यासाठी मी श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या कोमल चरणी शतश: कृतज्ञ आहे.’
– आपल्या चरणांच्या धुलीकणासाठी आतुरलेली,
कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, गोवा. (९.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |