पणजी, ३० नोव्हेंबर (वार्ता.) राज्यातील कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट होत असली, तरी आरोग्य खात्याने कोरोनाविषयक चाचण्या करण्याचे प्रमाण वाढवले आहे. सध्या राज्यभर सरासरी २ सहस्र चाचण्या केल्या जात आहेत. यापूर्वी या चाचण्यांचे प्रमाण अल्प करून १ सहस्र, तर कधी २०० चाचण्याही करण्यात आल्या आहेत, असे आरोग्य खात्याचे डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी सांगितले. उत्तर गोव्यातील कोविड केंद्राची क्षमता २७५ खाटांची असून त्यांपैकी सध्या २२० खाटा रिकाम्या आहेत. दक्षिण गोव्यातील कोविड केंद्राची क्षमता ६० खाटांची असून त्यांपैकी ४७ खाटा रिकाम्या आहेत. आरोग्य खात्याच्या म्हणण्यानुसार रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाकडे पुरेशी जागा आहे. सध्या पर्वरी येथील आरोग्य केंद्रात १०२, मडगाव येथील आरोग्य केंद्रात १०९, वास्को येथील आरोग्य केंद्रात ४०, फोंडा येथील आरोग्य केंद्रात १०४, पणजी येथील आरोग्य केंद्रात ८२ आणि चिंबल येथील आरोग्य केंद्रात ६८ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.