सतत भावावस्थेत असल्याने ‘कोरोना’सारख्या संकटाच्या वेळीही निश्‍चिंत आणि स्थिर असणार्‍या श्रीमती शुभा (स्मिता) राव !

श्रीमती शुभा राव

‘२९.३.२०२० या दिवशी ‘दळणवळण बंदी’ असतांना मला स्मिताताईंचा भ्रमणभाष आला. तेव्हा मी त्यांना ‘तुम्ही बर्‍या आहात का ?’, असे विचारले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘मला सगळे विचारतात, ‘‘तू एकटी कशी रहातेस ? तुला कंटाळा येत नाही का ? भीती वाटत नाही का ?’’ माझा सतत नामजप चालू असतो. मला घरात एकटे वाटत नाही. घरात प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) अस्तित्व जाणवते. ते मला सूक्ष्मातून म्हणतात, ‘तू एकटी नाहीस. मी तुझ्या समवेत आहे.’ प.पू. बाबांनी दिलेल्या या घरात (‘हे घर प.पू. बाबांनी मला दिले आहे’, असा स्मिता राव यांचा भाव आहे.’ – संकलक) मी सतत त्यांच्याच सहवासात वावरत असते. त्यामुळे ‘माझा दिवस कसा जातो ?’, हे मला कळतही नाही. ‘प.पू. बाबांनी दिलेले हे घर भरलेले आहे’, असे मला सतत वाटते. आताही (कोरोनामुळे २१ दिवस ‘दळणवळण बंदी’ असतांना) बाहेर जाऊन काही आणायचे आहे’, असे मला वाटत नाही. माझे ३ – ४ मास आरामात जातील.’’

​स्मिताताईंशी बोलत असतांना ‘कोरोनामुळे त्यांना कोणताही ताण किंवा भीती वाटत आहे’, असे मला जाणवले नाही. त्यांच्या प्रत्येक शब्दातून त्यांची प.पू. बाबा आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती असणारी दृढ श्रद्धा जाणवत होती. याउलट माझ्या मनात भविष्यातील संकटांविषयी अनेक विचार येऊन मला भीती वाटत होती. त्यांच्याशी बोलल्यावर ‘गुरूंप्रती असणारी श्रद्धा आणि साधना यांमुळेच आपण संकटांना सामोरे जाऊ शकतो’, हे मला देवाने पुन्हा एकदा दाखवून दिले.’

– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.३.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक