पणजी, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यात डिसेंबर मासात जिल्हा पंचायत निवडणुका होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘राज्य निवडणूक आयोग जिल्हा पंचायत निवडणुकीचा दिनांक निश्चित करणार आहे.’’ जिल्हा पंचायतींचा ५ वर्षांचा कालावधी २३ मार्च २०२० या दिवशी संपुष्टात आला. यामुळे जिल्हा पंचायतींच्या निवडणुका १५ मार्च २०२० या दिवशी होणार होत्या; मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. राज्यात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा, अशा दोन जिल्हा पंचायती आहेत. प्रत्येक जिल्हा पंचायतीमध्ये २५ मतदारसंघ आहेत. एकूण ५० मतदारसंघांमधील ४८ मतदारसंघांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी एकूण २०३ उमेदवार रिंगणात आहेत. सांकवाळ जिल्हा पंचायतीसाठी केवळ एकच उमेदवारी अर्ज आल्याने या ठिकाणचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे, तर एका उमेदवाराचे निधन झाल्याने नावेली जिल्हा पंचायतीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.