साधकांवर निरपेक्ष प्रेम करून त्यांना साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. साधकांना आनंद देण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करणे

१ अ. सद्गुरु राजेंद्रदादांना साधिका घाबरत असल्याचे तिच्या कुटुंबियांकडून कळल्यावर त्यांनी साधिकेसाठी खाऊ पाठवणे : ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे पूर्वी जिल्ह्यात होत असलेले सत्संग मी ऐकले होते. त्यामुळे ‘सद्गुरु दादा अतिशय कडक आहेत’, असे वाटून मी त्यांना कधीच भेटले नाही आणि त्यांच्याशी बोलले नाही. एकदा माझे आई-वडील देवद आश्रमात गेले होते. तेव्हा सद्गुरु दादांनी आम्हा सर्वांची विचारपूस केली. ‘मी त्यांना घाबरते’, हे कळल्यावर सद्गुरु दादांनी माझ्यासाठी रामनाथी आश्रमात खाऊ पाठवला.

कु. निकिता झरकर

१ आ. सद्गुरु दादांनी साधिकेच्या कुटुंबियांना ‘प्रवासात वातावरणातील पालटांमुळे त्रास होऊ नयेत’, यासाठी मार्गदर्शक माहिती कळवणे : एकदा ‘आम्ही संपूर्ण कुटुंब तिरुपतीला जाणार आहोत’, असे सद्गुरु दादांना समजल्यावर त्यांनी ‘तिथे किती तापमान आहे ?’ याविषयी सर्व माहिती भ्रमणभाषद्वारे पाहून मला त्यांसंबंधी छायाचित्र पाठवले. तसेच ‘ताई, तेथे पुष्कळ उकाडा असल्याने सुती कपडे घेऊन जा. त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही अन् स्नेहाताईला (बहिणीसाठी) प्रवासात थंडी लागू नये म्हणून ‘स्वेटर’ घ्यायला सांगा’, असा संदेश पाठवला. यातून ‘संत साधकांवर कुठल्या टप्प्यापर्यंत प्रेम करतात’, याची जाणीव होऊन आम्हाला कृतज्ञताभावाने पुष्कळ भरून आले.

१ इ. साधना करणार्‍या जिवाला आनंद देण्यासाठी प्रयत्नरत असणे : सद्गुरु दादा जेव्हा रामनाथीला येतात, तेव्हा ते मला आवडणारा खाऊ आणतात. ‘एखादा जीव साधना करतो, तर त्याला आनंद कसा देऊ ?’, यासाठी सद्गुरु दादा सतत प्रयत्नरत असतात.

२. साधनेचे प्रयत्न करण्यासाठी साहाय्य करून प्रोत्साहनही देणे

मी सद्गुरु दादांना भेटल्यावर प्रत्येक वेळी ते मला ‘मी साधनेचे काय प्रयत्न करते ?’, याविषयी विचारून ‘मी कुठे न्यून पडते’, हे सांगतात. त्याविषयी एखादा प्रसंग घडला, तर त्या क्षणी मला त्याची जाणीवही करून देतात आणि चांगले प्रयत्न झाले, तर लगेच ‘साधनेच्या योग्य प्रयत्नांमुळे तोंडवळ्यामध्ये पालट दिसत आहे’, असे म्हणून प्रोत्साहनही देतात.

३. सद्गुरु दादांनी साधिकेला ‘तुम्ही अहं-निर्मूलनासाठी कठोर प्रयत्न करायला हवेत’, अशी जाणीव करून देणे आणि नंतर तिच्याकडून त्यासंबंधी प्रयत्न होणे

मागील वर्षी दिवाळीला सद्गुरु दादा रामनाथी आश्रमात आले होते. तेव्हा मी पुष्कळ अस्वस्थ होते. त्या वेळी सद्गुरु दादांनी मला कठोरपणे सांगितले, ‘‘ताई, तुमचा अहं वाढला आहे. तुम्ही अहं-निर्मूलनासाठी कठोर प्रयत्न करायला हवेत.’’ कधीही भेटल्यावर ते मला प्रयत्नांची आठवण करून द्यायचे. एखादा जीव साधनेत अडून राहू नये आणि त्याला पुढे पुढे जाता यावे, यासाठी ते सतत प्रयत्नरत असतात. तेव्हा ‘त्यांचे साधकांवर किती अफाट प्रेम आहे’, याची मला जाणीव झाली आणि ‘मला अहं-निर्मूलनासाठी प्रयत्न करायचे आहेत’, याची अंतर्मनाला जाणीव होऊन माझ्याकडून प्रयत्न होऊ लागले.

४. साधकांना भाववृद्धीचे प्रयत्न करायला तळमळीने साहाय्य करणे

सद्गुरु दादा रामनाथीला आले होते. तेव्हा त्यांनी मला आणि माझ्या साधक-मैत्रिणीला बोलावून ‘भाववृद्धीचे प्रयत्न कसे करायचे ? भावस्थिती कशी टिकवून ठेवायची ?’, हे सारे समजावून सांगितले अन् त्याविषयी ते वेळोवेळी आठवणही करून देत होते. थोडक्यात, साधनेच्या दृष्टीने आमचे प्रयत्न व्हावेत, यासाठी आमच्यापेक्षा सद्गुरु दादांनाच अधिक तळमळ असल्याचे आम्हाला जाणवत होते.

५. रामनाथी आश्रमातील पाणी ‘तीर्थ आहे’, या भावाने प्रतिदिन प्राशन करणे

सद्गुरु दादा रामनाथी आश्रमातून देवद आश्रमात जातांना एक लिटर पाण्याची बाटली भरून नेतात आणि प्रतिदिन ‘ते तीर्थ आहे’, या भावाने त्यातील एक थेंब स्वतःच्या पिण्याच्या पाण्यात घालून पाणी पितात. त्यांचा गुरुदेव आणि रामनाथी आश्रम यांविषयीचा हा अत्युच्च भाव पाहून माझी भावजागृती झाली.

६. स्वतःला शारीरिक त्रास होत असतांनाही त्यांनी साधकांना ‘तुम्ही व्यष्टी साधना पूर्ण केल्याविना माझ्यावर उपचार करूच नका’, असे सांगणे आणि साधकांमध्ये व्यष्टी साधनेचे गांभीर्य निर्माण करणे

सद्गुरु दादांना कितीही शारीरिक त्रास होऊ देत; पण ते उत्साहानेच सर्वांशी बोलतात. त्यामुळे ‘त्यांना त्रास होत आहे’, हे समोरच्याला समजतही नाही. तसेच सद्गुरु दादांना ‘मालीश करणे’ आदी सेवा करणार्‍या साधकांकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न झालेले असतील, तरच ते साधकांना सेवेची संधी देतात, नाहीतर ‘तुम्ही व्यष्टी साधना पूर्ण केल्याविना माझ्यावर उपचार करूच नका’, असे सांगून त्यांना ते परत जाण्यास सांगतात. वेळ प्रसंगी ते स्वतःला होत असलेला त्रासही सहन करतात. यातून ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘नामजप, भाववृद्धीचे प्रयत्न’ आदी व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांवर अपार श्रद्धा असणे आणि आज्ञापालन करणे, हे गुण त्यांच्या मनात किती खोलवर रुजलेले आहे’, हे माझ्या लक्षात आले.’

 – कु. निकिता झरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.७.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक