उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्य यांच्या उपासनेमुळे तेथील मठातील दगडी शिळेवर त्यांचे गुरु राघवेंद्रस्वामी यांचा चेहरा प्रकट होणे !

राघवेंद्रस्वामी

१. ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्य यांचा थोडक्यात परिचय 

श्री. जयतीर्थ आचार्य

उडुपी (कर्नाटक) येथील श्री. जयतीर्थ आचार्य हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. उडुपी येथील ‘राघवेंद्रस्वामी मठा’ चे ते व्यवस्थापक आहेत. ते जगात घडणार्‍या विविध घडामोडींविषयीची भाकिते वर्तवत असतात. त्यांची बहुतेक भाकिते खरी ठरली आहेत.

श्री. आचार्य यांनी वर्तवलेली भाकिते वृत्तपत्रे आणि मासिके यांमधून प्रसिद्ध होतात. त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून त्यांचे भविष्य सांगितले होते.

२. श्री. आचार्य यांचे गुरु राघवेंद्रस्वामी यांचा परिचय 

श्री. आचार्य यांच्या गुरूंचे नाव राघवेंद्रस्वामी आहे. त्यांचा जन्म वर्ष १५९५ मध्ये तमिळनाडूमध्ये झाला. त्यानंतर वर्ष १६७१ मध्ये राघवेंद्रस्वामी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याप्रमाणे जिवंत समाधी घेतली. राघवेंद्रस्वामींचे समाधीस्थान मंत्रालय (आंध्रप्रदेश) येथे आहे.

श्री. राम होनप

३. ‘राघवेंद्रस्वामी यांनी जनकल्याणासाठी प्रगट व्हावे’, यासाठी श्री. आचार्य यांनी उपासना करणे आणि प्रत्यक्षातही मठातील दगडी वृंदावनावर राघवेंद्रस्वामी यांचा चेहरा प्रकट होणे 

गेल्या ४ – ५ मासांपासून श्री. आचार्य यांच्या मनात पुढील विचार येत होते, ‘राघवेंद्रस्वामींचा आंध्रप्रदेशातील समाधीस्थानात सूक्ष्मातून वास आहे. त्यांनी उडुपी येथील राघवेंद्रस्वामी मठात प्रकट व्हावे आणि जनकल्याण अन् हिंदु धर्माचे रक्षण यांविषयी मला मार्गदर्शन करावे.’ असे होण्यासाठी श्री. आचार्य यांनी गुरूंना प्रार्थना करून काही मास कठोर उपासना केली.

श्री. आचार्य यांच्या उडुपी (कर्नाटक) येथील ‘राघवेंद्रस्वामी मठा’त एक दगडी वृंदावन आहे. त्यावर मध्वाचार्यांची मूर्ती आहे. त्यांचा जन्म ८०० वर्षांपूर्वी झाला होता. १.९.२०२३ या दिवशी त्या दगडी वृंदावनावर राघवेंद्रस्वामी यांचा चेहरा प्रकट झाला. त्यानंतर ही घटना तेथील स्थानिक वृत्तपत्रे आणि मासिके यांमध्ये प्रसिद्ध झाली होती.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०२३)


श्री. जयतीर्थ आचार्य यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मी आपल्या चरणी साष्टांग नमस्कार करतो.

गुरूंना केलेल्या प्रार्थनेतील शब्दांमुळे त्यांचे तत्त्व आकर्षित होऊन ते रूपामध्ये प्रकट होणे

प्रश्न : १.९.२०२३ या दिवशी माझ्या मठातील दगडी वृंदावनावर माझे गुरु राघवेंद्रस्वामी यांचा चेहरा प्रकट झाला. या घटनेमागील सूक्ष्मातील प्रक्रिया कशी असते ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : गेल्या ४ – ५ मासांपासून आपल्या मनात ‘राघवेंद्रस्वामींनी उडुपी येथील राघवेंद्रस्वामी मठात प्रकट व्हावे आणि जनकल्याण अन् हिंदु धर्माचे रक्षण यांविषयी मला मार्गदर्शन करावे’, असे विचार येत होते. हे होण्यासाठी तुम्ही गुरूंना प्रार्थना करून काही मास कठोर उपासना केली. तुमची ही तळमळ आणि भाव यांमुळे राघवेंद्रस्वामींचे तत्त्व तुमच्याकडे आकर्षित झाले. ‘भाव तेथे देव’, असे आपण म्हणतो. जेथे भाव असतो, तेथे देवाचे तत्त्व आकर्षित होते. अध्यात्मात ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांची शक्ती एकत्रित असतात’, हा एक सिद्धांत आहे. तुम्ही गुरूंना केलेल्या प्रार्थनेतील शब्दांमुळे त्यांचे तत्त्व आकर्षित होऊन ते रूपामध्ये प्रकट झाले. त्यामुळे मठातील दगडी तुळशी वृंदावनावर, म्हणजे सात्त्विक ठिकाणी राघवेंद्रस्वामी यांचा चेहरा उमटला. हे त्यामागील शास्त्र आहे.

सनातन धर्म आणि धर्मकार्य यांविषयीच्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी राघवेंद्रस्वामी तुम्हाला आतून मार्गदर्शन करतील !

प्रश्न : माझ्याकडे अनेक लोक ज्योतिषाविषयी प्रश्न विचारण्यासाठी येतात. आता गुरु मला सनातन धर्माविषयी किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सूक्ष्मातून मार्गदर्शन करतील का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुमच्या प्रार्थनेनुसार ‘जनकल्याण आणि हिंदु धर्माचे रक्षण यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी’ मठातील तुळशी वृंदावनावर राघवेंद्रस्वामींचा चेहरा उमटला. सनातन धर्म आणि धर्मकार्य यांविषयी लोकांचे प्रश्न असतील, तर त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी गुरु तुम्हाला आतून मार्गदर्शन करतील. तुम्ही तुमच्या ज्योतिषशास्त्राविषयीच्या ज्ञानाचा, या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपयोग करावा. त्या वेळी गुरु तुम्हाला प्रश्नांची उत्तरे आपोआपच सुचवतील.