‘गोपालन’ हे सर्वांत पुण्यकार्य ! – बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री

श्‍वेतकपिला गायीचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या हस्ते पूजन

 मडगाव, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘गोपालन’ हे सर्वांत पुण्यकार्य आहे. सिकेरी, मये येथील गोशाळेचे कार्य खूप चांगले आहे. या ठिकाणी सर्वजण नि:स्वार्थीपणे कार्य करत आहेत. गोशाळेला शासनाच्या वतीने अपेक्षित सहकार्य करण्यात येणार आहे, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी दिले. पाडव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सिकेरी, मये येथील गोशाळेला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी वरील आश्‍वासन दिले. या वेळी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात व्यासपिठावर कला अकादमीचे माजी सचिव डॉ. गोविंद काळे, केपे ज्ञानेश्‍वर माऊली मठाचे सुदर्शन महाराज, ‘पतंजलि’चे दिनेश वाघेला, गोशाळेचे कमलाकांत तारी, मये पंचायतीचे सरपंच तुळशीदास चोडणकर, कमलेश बांदेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर पुढे म्हणाले, ‘‘आज प्रत्येक जण आपल्या व्यवसायवृद्धीसाठी धडपडत असतो आणि या पार्श्‍वभूमीवर गोशाळेतील १ सहस्र २०० गोवंशाचे पालन करणे, हे काम सोपे नाही. शासन या उपक्रमाला अनुदान देते, तसेच मी वैयक्तिक स्तरावरही गोशाळेला सहकार्य करणार आहे.’’

कार्यक्रमाच्या प्रारंभी कमलेश बांदेकर यांनी गोशाळेच्या कार्याची माहिती दिली. गोव्यात येणार्‍या प्रत्येकाला गोव्याची ओळख व्हावी, या हेतूने पणजी येथे वाहतूक बेटाजवळ श्‍वेतकपिला शिल्प बसवण्यास शासनाने अनुज्ञप्ती देण्याची मागणी करण्यात आल्यावर उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा करणार असल्याचे सांगितले. मये येथील गोशाळेत ४२ श्‍वेतकपिला जातीच्या गायी आहेत. या वेळी डॉ. गोविंद काळे, सुदर्शन महाराज, सरपंच तुळशीदास चोडणकर आदींनीही त्यांचे विचार मांडले.