भारतात मुसलमान आक्रमणकर्ते येण्यापूर्वी ‘या भूमीत भोजन म्हणून गोहत्या केली जात होती’, असे ऐकिवात नाही किंवा वाचण्यातही येत नाही. प्रत्येक हिंदु राजा ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ होता. त्यामुळे गोहत्या करण्याचा विचारही जनतेच्या मनात येत नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनाही ही पदवी देण्यात आली होती. त्यांनी लहानपणीच गोहत्या करणार्या एका मुसलमानाचा हात छाटला होता, असा इतिहास आहे. भारतात गोहत्या करण्यासाठी पशूवधगृहेही नव्हती. मुसलमान वैयक्तिकरित्या किंवा मुसलमान कसाई व्यवसाय म्हणून गोहत्या करत होते. इंग्रजांच्या काळात प्रथम पशूवधगृहे अस्तित्वात आली आणि नंतर इंग्रजांनी देशात ठिकठिकाणी पशूवधगृहे बांधून मोठ्या प्रमाणात गोवंशियांची हत्या चालू केली, तसेच त्यांचे मांस हिंदूंनाही खाण्याची सवय लावली. आज देशात सहस्रो पशूवधगृहे असून भारत गोवंशियांच्या मांसाची जगात निर्यात करण्यामध्ये दुसर्या क्रमांकावर आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे हिंदु संस्कृतीच्या अत्यंत उलट गोष्ट आज देशात होत आहे. यातून अनेक गोष्टींत आपण जशी इंग्रजांची अद्यापही गुलामगिरी करत आहोत, त्याचप्रमाणे पशूवधगृहांच्या संकल्पनेचीही करत आहोत. जैन धर्मियांच्या काही सणांच्या वेळी देशात काही ठिकाणी ही पशूवधगृहे बंद करण्याची मागणी केली जाते आणि ती मान्यही होते. हाच काय तो अपवाद असतो, अन्यथा देशात ही पशूवधगृहे चालूच असतात आणि कोट्यवधी गोवंशियांची हत्या केली जाते. या ठिकाणी गोवंशियांची अधिकृत हत्या होते; मात्र मुसलमान कसायांकडून होणार्या गोवंशियांच्या हत्यांवर बंदी आहे. देशातील अनेक राज्यांत ही बंदी आहे; मात्र तरीही सर्रास गोहत्या केली जाते. अनेक वेळा गोरक्षक गोहत्येसाठी नेण्यात येणारे गोवंश पकडून देतात किंवा गोमांस पकडून देतात. मुळात हे कार्य करणे पोलीस आणि प्रशासन यांचे काम असतांना गोरक्षकांना ते करावे लागते. म्हणजेच बंदीची कार्यवाही होत नाही, तेथे भ्रष्टाचार होतो, हे स्पष्ट आहे.
आता आसाम सरकारने यापुढच्या टप्प्याला जाण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने उपाहारगृहांमध्ये गोमांसाचे पदार्थ देण्यावर बंदी घातली आहे. हा अभिनंदनीय निर्णय असला, तरी याचे कितपत पालन केले जाईल, अशी शंका मनात उत्पन्न होतेच. आता अन्य राज्येही असा निर्णय घेऊ शकतील; मात्र आसाममधीलच विरोधी पक्षाच्या रफीकुल इस्लाम नावाच्या आमदाराने यावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचे म्हणणे आहे की, ‘आसाममध्ये अशी बंदी घालणारे भाजप सरकार गोव्यात मात्र अशी बंदी घालत नाही; कारण तशी बंदी घातली, तर तेथील सरकार तात्काळ कोसळेल.’ यातून ‘या बंदीमागे राजकीय कारण आहे’, असे त्याला सांगायचे आहे. याचा विचार हिंदूंनी करायचा आहे. मुळात प्रश्न हाच आहे की, हिंदु संस्कृतीनुसार गोहत्या बंदी असली पाहिजे. जर भारताला आपल्या संस्कृतीकडे परत जायचे असेल, तर असे निर्णय देशपातळीवर घ्यावे लागतील आणि त्याची कठोरपणे कार्यवाही करावी लागेल. इंग्रजांनी हिंदूंना बाटवण्यासाठी पशूवधगृहे चालू केली. हे लक्षात घेऊन गोवंशियांची हत्या करण्यावर बंदी घातली पाहिजे. गोहत्या करणार्या मुसलमान कसायांवरही बंदी घातली पाहिजे. त्यांना केवळ अन्य प्राण्यांचे मांस विकण्याची अनुमती दिली पाहिजे. असे केले, तरच गोमातेचे रक्षण होईल आणि खर्या अर्थाने धर्मरक्षण होईल, त्यातूनच गोमातेचे आशीर्वाद हिंदूंना मिळतील. अन्यथा सर्वच उपाय वरवरचे आणि स्वार्थी असतील !