गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे निधन

सौ. मृदुला सिन्हा

पणजी, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा (वय ७८ वर्षे) यांचे १८ नोव्हेंबर या दिवशी बिहार येथे वृद्धापकाळाने निधन झाले. सौ. मृदुला सिन्हा यांनी वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत गोव्याचे राज्यपालपद भूषवले होते.

सौ. मृदुला सिन्हा या गोव्याच्या पहिल्या पूर्णवेळ महिला राज्यपाल होत्या. सौ. मृदुला सिन्हा यांच्या निधनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आदींनी शोक व्यक्त केला आहे.

सौ. मृदुला सिन्हा यांचा २७ नोव्हेंबर १९४२ या दिवशी छप्रा, बिहार येथे जन्म झाला होता. मानसशास्त्रात त्यांनी पदव्युत्तर पदवी आणि त्यानंतर शिक्षणशास्त्रातील पदवीही संपादन केली होती. त्यांनी ४६ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचा विवाह डॉ. रामकृपाल सिन्हा यांच्याशी झाला. डॉ. सिन्हा हे महाविद्यालयातील व्याख्याते होते आणि त्यानंतर ते मंत्री झाले. त्या केंद्रीय समाजकल्याण मंडळाच्याही अध्यक्षा होत्या. जयप्रकाश नारायण यांच्या समग्र आंदोलनातही त्या सहभागी झाल्या होत्या.

‘राजभवना’त गोठा उभारून देशी गायीचे संगोपन करणार्‍या गोव्याच्या पहिल्या राज्यपाल ! – हनुमंत परब, गोवंश रक्षा अभियान

सौ. मृदुला सिन्हा यांनी गोव्याच्या राज्यपालपदाची धुरा हाती घेतल्यानंतर दोनापावला येथील राजभवन परिसरात गोठा उभारून त्याठिकाणी एका देशी गायीचे संगोपन केले होते. त्या प्रतिदिन त्याठिकाणी गोपूजन करत होत्या, तसेच देशी गायीचेच दूध प्राशन करायच्या. त्यांच्या या कृतीमुळे गोव्यातील गोवंश रक्षा अभियानाला बळकटी मिळाली आणि गोव्यात एक वेगळा आदर्श ठेवला. त्यांनी वाळपई येथील ‘अखिल विश्‍व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रा’ला दोन वेळा भेट दिली होती, अशी माहिती ‘गोवंश रक्षा अभियान’चे श्री. हनुमंत परब यांनी दिली आहे.

‘सौ. मृदुला सिन्हा यांच्या अकाली निधनामुळे ‘गोवंश रक्षा अभियान’ला अतिशय दु:ख झाले आहे. त्यांनी गामातेला राजभवनात नेऊन या विषयावर महान जागृती केली. त्यांचे संस्मरणीय कार्य ‘गोवंश रक्षा अभियान’ कधीही विसरणार नाही. भारतीय संस्कृतीचा त्यांनी सदैव पुरस्कार केला. त्यांनी त्याच्या राज्यपालपदाच्या कारकीर्दीत गोव्यात गावागावांत जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेऊन लोक संस्कृतीविषयी जागृती केली. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो, अशी प्रार्थना ‘गोवंश रक्षा अभियान’ने केली आहे.

गोव्याचीच नव्हे, तर राष्ट्रीय हानी ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, राज्य संघचालक, भारतमाता की जय संघ

गोव्याच्या माजी राज्यपाल मा. मृदुलाजी सिन्हा यांच्या निधनामुळे केवळ गोव्याचीच नव्हे, तर राष्ट्रीय हानी झाली आहे. त्यांची कारकीर्द अतिशय समाजाभिमुख अशी राहिली. समाजाच्या तळागाळातील घटकांच्या प्रश्‍नांशी एकरूप होण्याचा प्रयत्न त्यानी केला. भारतीय तेजस्वी महिलांचे आदर्श जीवन मांडणारे साहित्य त्यानी लिहिले. अनेक गोमंतकियांना त्यांची जवळीक आणि आपुलकी लाभली.त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना !

सौ. मृदुला सिन्हा यांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी कार्य केले ! – मुख्यमंत्री

सौ. मृदुला सिन्हा यांच्या निधनाविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘सौ. मृदुला सिन्हा यांच्या निधनाने धक्का बसला आहे. राज्यपालपदी असतांना त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी कार्य केले आहे. त्यांचे कला आणि साहित्य या क्षेत्रांतील योगदान उल्लेखनीय आहे. मृदुला सिन्हा या मला आईसमान होत्या.’’