‘ऑनलाईन’ धर्मप्रसाराची यशोगाथा !
दळणवळण बंदीच्या काळात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने करण्यात येणार्या ‘ऑनलाईन’ धर्मप्रसाराच्या अंतर्गत ‘चर्चा हिंदु राष्ट्रा’ची या अंतर्गत विशेष चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. या माध्यमातून देशभरातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांचे विचार दर्शकांना ऐकायला मिळाले. हा या चर्चासत्रांचा एक महत्त्वपूर्ण पैलू म्हणावा लागेल. प्रचलित व्यवस्थेमधील त्रुटींमागची कारणमीमांसा करून सर्व समस्यांना एकमेव उत्तर असणार्या हिंदु राष्ट्राची आवश्यकता प्रतिपादित करणे आणि दर्शकांना त्या दिशेने कृतीशील करणे, हा या चर्चासत्रांचा गाभा होता.
१. हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग
महाराष्ट्र, तेलंगाणा, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, राजस्थान, बंगाल, उत्तरप्रदेश, देहली, ओडिशा, जम्मू-काश्मीर या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी आतापर्यंत चर्चासत्रात सहभाग घेतला आहे. या व्यतिरिक्त बांगलादेश येथील हिंदूंच्या रक्षणासाठी कार्यरत असलेले ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष हेही ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले होते.
२. ‘हिंदु जागृती’ या ‘यू ट्यूब’ ‘चॅनल’च्या सभासदांमध्ये दुपटीहून अधिक वाढ !
हिंदु जनजागृती समितीच्या ‘Hindu Jagruti’ (हिंदु जागृती) या ‘यू ट्यूब चॅनेल’च्या माध्यमातून, तसेच ‘फेसबूक’द्वारे या चर्चासत्रांचे प्रक्षेपण करण्यात आले. दळणवळण बंदीच्या पूर्वी ‘हिंदु जागृती’ या ‘यू ट्यूब चॅनल’चे सबस्क्रायबर्स (सभासद) साधारण २५ सहस्र होते. जूनच्या शेवटी ते दुपटीहून अधिक, म्हणजे ५५ सहस्र झाले. ‘हिंदू अधिवेशन’ या ‘फेसबूक’पानाच्या दर्शकसंख्येतही वाढ झाली आहे.