दाभोळ (दापोली) – कोरोनाच्या नियंत्रणासाठी संपूर्ण देशभर दळणवळण बंदीचे आदेश शासनाने दिलेले आहेत. या आदेशाचे पालन करण्यासाठी दाभोळ सागरी पोलीस सतर्क झाले आहेत. या पोलिसांना दाभोळ पंचक्रोशीतील २५ पेक्षा अधिक युवक आणि ग्रामस्थ पोलीस मित्र बनवून सहकार्य करत आहेत.
पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम आणि एम्.पी. टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी चालू आहे. दाभोळ पंचक्रोशीतील युवक, ग्रामस्थ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडणार्या ग्रामस्थ आणि रुग्ण यांना सहकार्य करत आहेत. मात्र विनाकारण फिरणार्यांवर जरब बसावी, यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस चौकशीही करण्यात येत आहे.
दाभोळ मध्ये धूर फवारणी, तर बंद दवाखाने चालू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य साथींचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी दाभोळ ग्रामपंचायतीने गावातील गटारांमध्ये धूर फवारणी केलेली आहे. बंद झालेले खासगी दवाखाने हे ग्रामस्थांच्या विनंतीवरून पुन्हा चालू झालेले आहेत. याशिवाय दाभोळ खाडीमध्ये होणारी ‘फेरी बोट’, ‘लॉन्च’, ‘डिप्को’ प्रवासी वाहतूक सेवा दाभोळ बंदर विभागाने पूर्णपणे बंद आहे.
समुद्रामार्गे पंचनदी येथे येणारे २९ जण पोलिसांच्या कह्यात
हर्णे येथील २, तर मुंबई येथील १ अशा ३ बोटी पंचनदी, लखडतर येथे आल्याचे समजताच दाभोळ सागरी पोलिसांनी तेथे त्वरित ३ बोटींमधील २९ जणांना कह्यात घेतले. हे सर्वजण बोटीवरचे खलाशी असून दापोली तालुक्यातीलच आहेत. सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सी.आर्.पी.सी. १४९ प्रमाणे त्यांना घरातून बाहेर न पडण्याची नोटीस देण्यात आली आहे. (संदर्भ : कोकणस्टार )