महाराष्ट्रातून स्थलांतर करणार्‍यांना थांबवा ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

मुंबई – कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यासमवेत राज्यातून इतरत्र स्थलांतर करत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबवण्यासाठी पावले उचलावीत, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत. २८ मार्च या दिवशी राज्यपालांनी नागपूर, अमरावती, नाशिक, संभाजीनगर, कोकण आणि पुणे या विभागांच्या सर्व विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. या वेळी राज्यपालांनी विभागीय आयुक्तांना जिल्हाधिकार्‍यांना वरील निर्देश देण्याच्या सूचना दिल्या. ‘सर्व मोठी शहरे आणि औद्योगिक वसाहती यांमध्ये सार्वजनिक उद्घोषणा करून स्थलांतर करत असलेल्या लोकांना थांबवण्याचा आग्रह करावा. त्यांच्यासाठी निवास आणि भोजन यांची व्यवस्था करण्यासाठी शासन, तसेच अशासकीय संस्था करत असलेल्या प्रयत्नांविषयी त्यांना अवगत करावे’, अशी सूचनाही राज्यपालांनी सर्व विभागीय आयुक्तांना या वेळी केली.