कोरोना रुग्णांविषयी अफवा पसरवल्याप्रकरणी नागपूर, रायगड, पुणे येथे ८ जणांवर गुन्हा नोंद

कोरोनाविषयी जनजागृती करून समाजातील लोकांना साहाय्य करण्याऐवजी समाजात अफवा पसरवून लोकांना भयभीत करणारे समाजद्रोहीच आहेत ! त्यामुळे अफवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी !

नागपूर – कोरोना रुग्णांविषयी अफवा पसरवल्याप्रकरणी नागपूर, रायगड, पुणे येथील ८ जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. ‘यापुढे खोटे संदेश, ध्वनीमुद्रित ‘क्लिप’, ध्वनीचित्रफीत पसरवणार्‍यांना कारागृहात पाठवण्यात येईल’, अशी चेतावणी येथील पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली आहे.

नागपूर येथे २४ मार्च या दिवशी शहरात कोरोनाचे ५९ रुग्ण असल्याची खोटी ध्वनीमुद्रित ‘क्लिप’ ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर पसरवणार्‍या तिघांना पोलिसांच्या सायबर सेलने २७ मार्च या दिवशी अटक केली. आरोपी जय गुप्ता, अमित पारधी आणि दिव्यांशू मिश्रा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

रामटेक येथे आरोपी नीलेेश भाटी (वय ३३ वर्षे) याने फेसबूकवर कोरोनाविषयी अनावश्यक माहिती देऊन अफवा पसरवल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गावबंदी करणारे सरपंच आणि पोलीस पाटील यांच्यावर गुन्हा नोंद

रायगड – जिल्ह्यात कोरोनाच्या भीतीने गावात बाहेरून येणार्‍या व्यक्तीला बंदी घालण्यात येत आहे. अशी बंदी घालणारे गावांतील सरपंच आणि पोलीस पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिला आहे, तसेच गावात अशी गावबंदी केली असल्यास १०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.