मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदीदारांचा हलगर्जीपणा !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक ती काळजी न घेणारे बाजारातील विविध घटक !

आपत्कालीन स्थितीत केलेला छोटासा निष्काळजीपणाही प्राणावर बेतू शकतो. जनतेच्या जिवाशी खेळणारे खरेदीदार ! प्रशासन अशांवर काय कारवाई करणार ?

नवी मुंबई – मुंबईकरांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी शासनाने नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (ए.पी.एम्.सी.) बाजारपेठा २६ मार्चपासून चालू केल्या आहेत; मात्र शेतमाल खरेदीदारांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेची काळजी घेतली नसल्याने त्यांच्या या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांवर कोरोनाचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ए.पी.एम्.सी.तील कोणत्याही बाजारपेठेमध्ये आरोग्यविषयक सुरक्षा नियमांची कार्यवाही काटेकोरपणे केली जात नाही. त्यामुळे बाजार समितीमधून कोरोना विषाणूच्या संसर्गाची मोठ्या प्रमाणात शक्यता निर्माण झाली आहे. भाजी बाजारात २७ मार्चला ५०० गाड्यांची आवक आणि जावक झाली. मुंबईतील किरकोळ भाजी खरेदीदारांनी पहाटेपासून या बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेक  खरेदीदारांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेची काळजी घेतली नव्हती. यामुळे व्यापारी आणि माथाडी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाजारातील अनावश्यक गर्दी टाळण्याचे बाजार समिती प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नागरिक काळजी घेत नसल्याचे चित्र होते. प्रशासनाने बाजार आवाराचे निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच आवक गेटवर उपलब्ध असलेले थर्मल चेकअप (पडताळणी) करून, सॅनिटायझर लावून आणि ‘मास्क’ बांधला असेल, तरच सर्व घटकांना प्रवेश दिला जात आहे. असे असतांनाही अनेक खरेदीदार नंतर ‘मास्क’ काढून टाकणे, दोन जणांमधील सुरक्षित अंतर न ठेवणे असे प्रकार करत होते. त्याचप्रमाणे अन्य सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात होते. पोलीस प्रशासन, बाजार समिती कर्मचारी, व्यापारी यांनी वारंवार सांगूनही खरेदीदारांसह काही व्यापारी, माथाडी आणि अन्य घटक यांमध्ये याचे कोणतेही गांभीर्य दिसून येत नव्हते. परिणामी या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांवर कोरोनाचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.