रत्नागिरी – सहकारी पतसंस्थांमध्ये जनतेचा पैसा गुंतलेला असतो, सबब ग्राहकांची पैशांची मागणी पूर्ण करण्यासाठी पतसंस्था चालू रहाणे आवश्यक ठरते, किमान कर्मचार्यांना उपस्थित ठेवून कामकाज करावे, असे निर्देश आज सहकार आयुक्त यांनी परिपत्रक काढून दिले आहेत. दळणवळण बंदी चालू झाल्यानंतर पतसंस्था कर्मचार्यांना पोलीस यंत्रणेकडून अटकाव होत होता; मात्र कोणतेही स्पष्ट आदेश संस्था बंद ठेवण्याविषयी नसल्याने पतसंस्था चालक आणि कर्मचारी यांची अडचण झाली होती. त्यामुळे या संदर्भात सहकार खाते, तसेच केंद्रीय गृहमंत्रालय स्थरावर पाठपुरावा चालू होता. याविषयी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनीही पाठपुरावा केला. यानंतर सहकार खात्याचे पतसंस्थांचे कामकाज चालू ठेवण्याविषयी आदेश प्राप्त झाले असल्याची माहिती फेडरेशनचे अध्यक्ष अधिवक्ता दीपक पटवर्धन यांनी दिली. ‘कोरोनाचा प्रसार रोखणे, ही प्राथमिकता लक्षात घेऊन ग्राहकांना सेवा द्याव्यात ’, असे आवाहन करतांनाच पतसंस्थांची वर्ष अखेर ३१ मार्चलाच होईल. यामध्ये मुदतवाढ नाही. सबब संस्थांनी त्यादृष्टीने पूर्तता कराव्यात.