(म्हणे) ‘देवस्थानांनी स्वत:ची दानपेटी समाजासाठी उघडी करावी !’ – रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

देवस्थानकडून पैशांची अपेक्षा करणार्‍यांनी प्रथम स्वपक्षाची तिजोरी जनतेसाठी उघडावी

मुंबई, २७ मार्च (वार्ता.) – कोरोनाविरुद्धच्या लढाईत साहाय्यासाठी पुढे आलेले लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सिद्धीविनायक, शिर्डी देवस्थान यांचे मी आभार मानतो. देणगीरूपात जमा झालेला दानपेटीतील पैसा समाजासाठी देण्याची हीच वेळ आहे. अन्य देवस्थानांनीही स्वत:ची दानपेटी समाजासाठी उघडी करावी, असे ‘ट्वीट’ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. हे ‘ट्वीट’ त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘टॅग’ केले आहे. रोहित पवार यांच्या या भूमिकेविषयी अनेकांनी प्रतिक्रियांद्वारे असंतोष व्यक्त केला आहे. (शासकीय निधीमध्ये भ्रष्टाचार करून जनतेचे पैसे लुबाडण्यात येतात आणि भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या मंदिरांतील निधीवरही डल्ला मारला जातो. मंदिरांतील भक्तांनी अर्पण केलेल्या पैशांचा विनियोग हा खरेतर धार्मिक कार्यासाठी व्हायला हवा. तरीही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून हिंदूंची अनेक देवस्थाने आपत्काळात मंदिरातील निधी समाजासाठी देतातच, ही हिंदु धर्माची महानता आहे. त्यासाठी कुणी आवाहन करण्याची आवश्यकता नाही ! – संपादक)

रोहित पवार यांच्या या ‘ट्वीट’विषयी व्यक्त केलेल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया

के.फ्. पांडा – आपल्या राज्यात दर्गे, मशिदी, चर्चसुद्धा आहेत. त्यांनाही आवाहन केले, तर बरे होईल. सर्वांचा साहाय्याचा भार केवळ हिंदूंच्या मंदिरांनी घ्यायचा ?

विशाल हिंगे – सर्वप्रथम आपल्या सर्व आमदार आणि खासदार यांचे एका मासाचे वेतन कोरोनानिधीमध्ये जमा करण्याची विनंती करावी.

श्रीकांत कदम – वारंवार मंदिरांवर प्रश्‍न निर्माण करता. स्वत: तर देतच नाहीत.