भाईंदर येथे संचारबंदीचा अपलाभ घेत गुटखा पुरवणार्‍याविरुद्ध गुन्हा नोंद

समाजास बाधक ठरणार्‍या व्यसनाधीनतेला वेळीच आळा बसायला हवा. पोलिसांनी यासाठी कठोर पावले उचलावीत, हीच अपेक्षा !

ठाणे – महाराष्ट्रात माव्यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असतांनाही संचारबंदीचा अपलाभ घेत चोरीच्या मार्गाने गुटखा पुरवणार्‍या जयेश शर्मा याला भाईंदरच्या कस्तुरी पार्क येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून ८५ सहस्र रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. तो दुचाकीवरून शहरात ठिकठिकाणी गुटखा पुरवण्यासाठी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.