पुण्यातील आणखी ३ रुग्ण कोरोनामुक्त

गेल्या ४८ घंट्यांत शहरात एकही नवा कोरोनाग्रस्त रुग्ण नाही

पुणे – महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रोगांच्या रुग्णालयातील आणखी ३ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. गेल्या ४८ घंट्यांत शहरात एकही नव्या कोरोनाग्रस्त रुग्णाची भर पडली नाही, असेही मोहोळ यांनी सांगितले. पुण्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त दांपत्याची मुलगी, दांपत्याला मुंबईहून घेऊन येणारा वाहनचालक आणि दुबई येथील सहलीमधील एक प्रवासी यांचा बरे झालेल्यांमध्ये समावेश आहे. कोरोनाबाधित दांपत्याला घरी सोडण्यात आल्यानंतर या तिघांच्या दुसर्‍या चाचण्याही ‘निगेटिव्ह’ आल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची शहरातील संख्या ५ झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित आढळलेल्या ३ पुरुषांची १४ दिवसांनंतरची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली आहे. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने (स्वॅब) २६ मार्चला राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवले आहेत. ही चाचणीही ‘निगेटिव्ह’ आल्यास या रुग्णांना घरी सोडण्यात येईल.