उद्वेग लक्षात घ्या !

संपादकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी म्हणजे १४ एप्रिलपर्यंत दळणवळणावर बंदी घालण्यात आल्याची घोषणा केली आहे. गेले अनेक दिवस जनतेला ‘आवश्यक नसतांना घराबाहेर पडू नका’, असे आवाहन केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून केले जात होते; मात्र जनतेने याला अपेक्षित असा प्रतिसाद न दिल्याने प्रथम २२ मार्च या दिवशी ‘जनता कर्फ्यू’ घोषित करण्यात आला. त्याला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला; मात्र दुसर्‍याच दिवशी पुन्हा नियमित दिनक्रम चालू करून ‘जनता कर्फ्यू’च्या उद्देशाला अक्षरशः हरताळ फासण्यात आला. यामुळेच महाराष्ट्र आणि पंजाब राज्यांनी तेथे संचारबंदी घोषित केली. त्यानंतर आता मोदी यांनी २१ दिवस दळणवळणावर बंदी घातली. ‘या कालावधीत जीवनावश्यक वस्तू मिळतील’, असेही मोदी यांनी घोषित केले. ‘त्यांचा साठा करू नये किंवा त्यासाठी गर्दी करू नये. २ व्यक्तींमध्ये अंतर ठेवा’, असे आवाहनही त्यांनी केले आहे. इतके सर्व सांगूनही आणि होऊनही दुसर्‍याच दिवशी सकाळी मुंबई, ठाणे आदी ठिकाणी लोक भाजी बाजारामध्ये गर्दी करून भाजी विकत घेत असल्याची दृश्ये समोर आली. ‘हा निष्काळजीपणा भारताला परवडणारा नाही, हे भारतियांना कधी कळणार आहे ?’ असा प्रश्‍न प्रत्येक उत्तरदायी नागरिकाच्या मनात आल्याविना रहाणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी इटली, चीन, स्पेन या देशांतील सध्याच्या स्थितीची जाणीव करून देऊन ‘आपण किती गांभीर्याने वागले पाहिजे’, हे अत्यंत कळकळीने सांगूनही जर काही नागरिक असे काही करत असतील, तर आता शासनाने काय करायचे ?’, असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यात तेलंगण राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ‘जर नागरिक आवाहनाचे पालन करणार नसतील आणि रस्त्यावर येत असतील, तर नाईलाजाने दिसताक्षणी गोळ्या घालाव्या लागतील किंवा सैन्याला पाचारण करावे लागेल’, असा उद्वेग व्यक्त केला आहे. एका लोकशाही देशामध्ये अशा प्रकारचा उद्वेग शासनाला व्यक्त करावा लागत आहे आणि त्याला अन्य कोणताही राजकीय पक्ष विरोध करत नाही किंवा मानवतावादीही विरोध करतांना दिसत नाहीत, यातून या विधानाचे गांभीर्य लक्षात येते. उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यावर तेथील हुकूमशहा किम जोंग याने त्या रुग्णाला गोळ्या घालून ठार करण्याचा आदेश दिल्यावर त्याची कार्यवाही करण्यात आली होती. ‘या रुग्णामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव देशातील अन्य लोकांना होऊ नये’, असा त्यामागे विचार होता. हे अमानवी कृत्य आहे आणि त्याचे कुणीही समर्थन करू शकत नाही. भारतात हुकूमशाही नाही. भारतात लोकांनी लोकांच्या भल्यासाठी लोकांच्या माध्यमातून चालवलेली ‘लोकशाही’ आहे आणि त्याच लोकशाहीतील लोकांनी निवडून दिलेले शासनकर्ते लोकांच्याच भल्यासाठी ‘घराबाहेर पडू नये’, असे आवाहन करत आहेत अन् लोक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, तर अशा लोकांना दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचे विधान शासनकर्त्यांना करावे लागत आहे, हे भारतीय जनतेला लज्जास्पद आहे, असेच म्हणावे लागेल. जगभरात कोणत्याही देशाच्या प्रमुखाने असे विधान केलेले नाही. चीनसारख्या देशामध्येही असे कुणी विधान केलेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

पाश्‍चात्त्य देशांच्या चुकांतून शिका !

ऑस्ट्रेलियातील सिडनी मध्ये समुद्रकिनारी मुक्तपणे वावरणारे लोक

सध्या विनाकारण रस्त्यावर येणार्‍या लोकांवर पोलिसांकडून लाठीमार केला जात आहे, त्यांना उठाबशा काढण्यास सांगितले जात आहे. सध्या तरी पोलिसांना ‘अधिक कठोर होऊ नये’; म्हणून सांगण्यात आले आहे. काही राज्यांत अशांना शिक्षा करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. चीनमध्ये विनाकारण बाहेर पडलेल्यांना खेचत नेऊन त्यांना  विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत होते. केवळ भारतासारख्या विकसनशील देशातच अशी स्थिती आहे, असे नाही, तर ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्येही लोक समुद्रकिनारी मुक्तपणे वावर करत आहेत, असे चित्र आहे. ‘पुढारलेल्या या देशात अशी स्थिती आहे, तर भारतात तशी असल्यास दोष कुणाला द्यायचा ?’, असा विचारही येऊ शकतो. युरोप आणि अमेरिका येथेही प्रारंभी ‘कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो’, याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. प्रचंड निष्काळजीपणा करण्यात आला. तेथील तरुण कोरोनावरून थट्टामस्करी करत होते. मौजमजा केली जात होती. ‘कोरोना पार्ट्या’ आयोजित केल्या जात होत्या. नेहमीप्रमाणेच लोक समुद्रकिनारी गर्दी करत होते. त्याचा परिणाम आज त्यांना भोगावा लागत आहे आणि या चुकीची त्यांच्या राष्ट्रप्रमुखांना स्वीकृतीही द्यावी लागली आहे. तशी स्थिती भारतात येऊ नये, यासाठीच पंतप्रधान मोदी प्रयत्न करत आहेत. त्यांना संपूर्ण जनतेने तितक्याच गांभीर्याने साहाय्य केले पाहिजे. शाहीन बाग येथे धर्मांधांकडून याला प्रतिसाद दिला जात नसल्याचे पाहून शेवटी देहली पोलिसांनी बळाचा वापर करून जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने धर्मांध आंदोलनकर्त्यांवर कारवाई केली. असाच कठोरपणा सर्वत्र करावा लागणार आहे. तरीही कुणी रस्त्यावर येत असेल, तर के. चंद्रशेखर यांनी म्हटल्याप्रमाणे सैन्याला पाचारण करावे लागेल आणि त्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश शासनाला द्यावा लागला, तर आश्‍चर्य वाटू नये.

घरात राहून स्वतःचे रक्षण करा !

भारतीय सैनिक देशाचे आणि देशातील जनतेचे सीमेवर खडा पहारा ठेवत दिवस रात्र, ऊनपाऊस, थंडीवारा अशा वातावरणांत रक्षण करत असतात. हे पहाता सध्या भारतीय जनतेला खाऊन पिऊन, मनोरंजन करत, विश्रांती घेत देशाचे आणि स्वतःसह देशातील जनतेचे रक्षण करण्यासाठी घरात बसायचे आहे अन् तेही जर करता येणार नसेल, तर अशा लोकांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याचा विचार कुणाच्याही मनात उपस्थित होईल. संपूर्ण जग कोरोनामुळे संकटात असतांना, एखाद्या महायुद्धापेक्षाही भयानक स्थिती असतांना जर काही नागरिक स्वतःचा आणि अन्य लोकांचाही जीव संकटात टाकणार असतील, तर शासनाला टोकाचे पाऊल उचलणे अपरिहार्य आहे.