सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे महत्त्वाचे !

सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे, हा खरा सत्समागम आहे. देहाचे भोग येतील-जातील; पण तुम्ही सदा आनंदात रहा. तुम्हाला आता काही करण्याचे उरले आहे, असे मानू नका.

बुद्धीला आवरण्याच्या युक्तीचे सर्वोत्कृष्ट साधन म्हणजे आज्ञापालन !

प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले, तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे, हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे.

अपयश आले, तरी ईश्वराच्या मार्गावर पाऊल परत परत पुढे ठेवा !

धाडसी बना. धैर्य सोडू नका. सहस्र वेळा अयशस्वी झाला, तरीही ईश्वराच्या मार्गावर एक पाऊल पुढे ठेवा, पुनश्च ठेवा, परत ठेवा, यश अवश्य मिळेल.

वाईट मार्गाने आलेली संपत्ती एकाएकी नष्ट होणे आणि धर्माने आलेली संपत्ती चिरस्थायी असणे

जसे कापसाच्या गोदामाला आग लागल्यावर सर्व कापूस नष्ट होतो, तसेच वाईट मार्गाने आलेली संपत्ती एकाएकी नष्ट होते.

कर्मयोगाचे महाब्धी (महासागर) असणारे सद्गुरु !

‘कर्माचा कर्मयोग करण्याकरता खुबी (कौशल्य) लागते, तसेच कर्मयोगाच्या आचरणाच्या सहजतेकरता शिक्षण लागते. या दोन्ही गोष्टी ज्यांनी आत्मसात् केल्या आहेत, त्यांनाच ‘सद्गुरु’ म्हणतात.

अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणारे तेज म्हणजे सद्गुरु !

गुरु या शब्दात २ अक्षरे आहेत. ‘गुकार’, म्हणजे अंधकार आणि ‘रुकार’ म्हणजे तेज. अंधकाराचा नाश करणारे तेज. जसे सूर्याचे कार्य असते, तसेच सद्गुरूंचे कार्य असते.

जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे !

जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की, परमेश्वर सुटला.’

भगवंताच्या नामाचा सदोदित ध्यास हवा !

आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसर्‍या टोकाला आहोत. त्याच्या नामाने त्याला जवळ जवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल, तितका भगवंत आपल्या जवळ येईल. भगवंताच्या नामातच सत्संगती आहे.

कार्य करतांना अकर्त्या आणि अभोक्त्या आत्म्यामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करा ! 

‘आपल्या प्राणांची पूर्ण शक्ती लावून पूर्ण मनापासून कार्य करा. कार्य पूर्ण केल्यानंतर कर्तेपणाला लगेच झटकून टाका.