ज्यांना जनतेने ८० ते ९० वेळा नाकारले ते राजकीय लाभासाठी संसदेचे कामकाज थांबवण्याचा प्रयत्न करतात !

पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांना सुनावले !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक कामकाज विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कृतींवर जनतेचे बारीक लक्ष आहे. स्वतःच्या राजकीय लाभासाठी काही लोक, ज्यांना जनतेने नाकारले आहे, ते संसदेवरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. संसदेचे कामकाज थांबवून त्यांचे स्वतःचे उद्दिष्ट साध्य होत नाही; पण त्यांची अशी कृती पाहून जनता त्यांना नाकारते. जनतेने या लोकांना ८० ते ९० वेळा नाकारले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना काँग्रेससह विरोधी पक्षांवर टीका केली.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, वर्ष २०२४ चा हा शेवटचा काळ आहे. देशही २०२५ चे स्वागत जोशात आणि उत्साहात करण्याच्या सिद्धतेत आहे. संसदेचे हे अधिवेशन अनेक अर्थाने विशेष आहे. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे आपल्या राज्यघटनेचा ७५ व्या वर्षात प्रवेश होणे, ही लोकशाहीसाठी अतिशय उज्ज्वल घटना आहे.