नवी देहली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. दोन्ही सभागृहात विरोधकांनी अदानी यांच्यावरील अमेरिकेतील आरोप आणि उत्तरप्रदेशातील संभल येथे झालेला हिंसाचार यावर चर्चेची मागणी केली. या वेळी विरोधी पक्षांच्या खासदारांनी गोंधळ घातला. अंततः दोन्ही सभागृहांचे कामकाज २७ नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आले.
मणीपूर हिंसाचार आणि केरळमधील वायनाड येथील आपत्ती यांविषयी राज्यसभेतही विरोधकांनी स्थगन प्रस्ताव दिल्याचे वृत्त आहे. हिंसाचाराच्या सूत्रावरून विरोधी खासदारांनी भाजपला धारेवर धरले. या वेळी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी मोठ्या आवाजात त्यांची मते मांडण्याचा प्रयत्न करतांना गोंधळ घातला. या वेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवही उभे असल्याचे दिसले. इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही विविध मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणला. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहात शून्य तास आणि प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही.
संपादकीय भूमिकाशाळेत गोंधळ घालणार्या बेशिस्त विद्यार्थ्यांना ज्या प्रमाणे शिक्षा केली जाते, त्याप्रमाणे संसदेत गदारोळ घालून संसदेचे कामकाज रोखून पैशांचा अपव्यय करणार्या खासदारांना शिक्षा का केली जात नाही ? |