कल्याण येथील अल्पवयीन मुलीचा मारेकरी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या  

विशाल गवळी

कल्याण, १३ एप्रिल (वार्ता.) – येथील पूर्वेतील चक्कीनाका भागात वर्ष २०२४ मध्ये १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार विशाल गवळी याने १३ एप्रिल या दिवशी पहाटे तळोजा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्यावर विनयभंग, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, चोरी, हत्येचा प्रयत्न, तडीपारीच्या आदेशाचा भंग करणे, अशा प्रकारचे एकूण ८ गंभीर गुन्हे नोंद आहेत. मुलीच्या हत्येपूर्वी तो अन्य एका गुन्ह्याच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने हे कृत्य केले. (आरोपीला आरंभीच कठोर शिक्षा झाली असती, तर त्याने असे कृत्य करण्याचे धाडस केले नसते. – संपादक)
त्याने अल्पवयीन मुलीवर पाळत ठेवून, तसेच तिला आमीष दाखवून स्वतःच्या घरी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अत्याचारानंतर त्याने तिची क्रूरपणे हत्या केली. त्याची पत्नी साक्षी गवळी आणि विशाल यांनी मुलीचा मृतदेह कल्याण-भिवंडी मार्गावरील बापगाव परिसरात फेकून दिला. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न चालू होते.