सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा लोकाभिमुख कारभारावर भर

जनतेला सेवा देण्यासह कार्यालये आणि कार्यालयांचा परिसर नीटनेटका करण्याचा प्रयत्न

श्री. रवींद्र खेबुडकर

सिंधुदुर्गनगरी – राज्यशासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा कारभार लोकाभिमुख करण्यावर नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी भर दिला आहे. या अंतर्गत जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ अद्ययावत करणे, जनतेच्या तक्रारी ऑनलाईन सोडवणे, विकासकामांची निविदा प्रक्रिया संकेतस्थळावर ठेवणे, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांची कार्यालये स्वच्छ अन् नीटनेटकी करणे आणि जनतेला चांगली सेवा देण्याच्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न चालू केले आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरांवरही स्वच्छता अन् कार्यालय अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. गेल्या काही दिवसांत प्रत्येक विभागाचे कागदपत्र स्वच्छता, कार्यालयांमध्ये झाडांच्या कुंड्या लावणे, कार्यालयात मोठ्या प्रमाणात असलेले कागदपत्रांचे ढीग हटवणे, कागदपत्रांची छाननी करून निरुपयोगी धारिका आणि कामाच्या धारिका यांचे वर्गीकरण करणे आदी कामे करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सर्व सेवा संकेतस्थळाच्या माध्यमातून देतांना त्यांना कालमर्यादा ठरवून दिल्या आहेत. १८ एप्रिलला लोकसेवा हक्क दिन साजरा केला जणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरांवर असलेल्या एकूण २० जुन्या गाड्यांचे निर्लेखन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद कार्यालयाच्या भिंतींचा वापर प्रबोधनात्मक लिखाणासाठी उपयोगात आणून त्या बोलक्या केल्या जात आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कार्यालयांच्या परिसरात साचलेले कचर्‍याचे ढीग आणि अनावश्यक साहित्य काढून परिसर स्वच्छ करण्याच्या दृष्टीने अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नरत आहेत. पंचायत समितीच्या कार्यालयांना अचानक भेट देऊन ते पहाणी करत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद कार्यालयासह जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालये आणि परिसर स्वच्छ दिसू लागले आहेत.