डहाणू येथील ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वैशिष्ट्य असलेले श्रीमहालक्ष्मी मंदिर !

डहाणू येथील श्रीमहालक्ष्मी मंदिर

१. यात्रा

डहाणू येथील श्रीमहालक्ष्मी मंदिराची यात्रा चैत्र पौर्णिमा म्हणजेच ११ एप्रिल ते २७ एप्रिल म्हणजे चैत्र अमावास्येपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र आणि गुजरात येथील महालक्ष्मीचे भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री महालक्ष्मीदेवीला नवस करून नवसाचा पूर्णविधी केला जातो.

२. पुराणातील कथा ! 

श्री. अनिल साखरे

पुराणकाळात कोल्हापूरची महालक्ष्मीदेवी बाहेर दर्शनासाठी निघाली असतांना ती डहाणू या आदिवासी क्षेत्रांमध्ये आली होती. या वेळी पांडव त्यांचा वनवासातील कालावधी येथे घालवत असत. महालक्ष्मीचे साजिरे रूप पाहून भिमाने महालक्ष्मीला विवाह करण्याची विनंती केली असल्याची कथा आहे.

पुढे स्थानिक रानशेतजवळील मुसळी डोंगरातील एका गुहेत माता येऊन बसली. आजूबाजूच्या आदिवासींना डोंगरावरील गुहेतील देवीच्या निवासाविषयी समजले. तेव्हापासून पंचक्रोशीतील भाविक मातेच्या दर्शनासाठी डोंगरावरील गुहेत येऊ लागले. एके दिवशी गर्भवती आदिवासी महिला आईच्या दर्शनासाठी गेली. डोंगरावर चढतांना तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली. आईला त्याचे वाईट वाटले. आई म्हणाली, ‘आजपासून तू वर येऊ नकोस, आता मी खाली येते.’ आई डोंगरावरून खाली येऊन विवळवेढे गावात स्थायिक झाली.

३. मंदिराची वैशिष्ट्ये !

१००८ मध्ये सुलतान महंमद याने आक्रमण करून मंदिर लुटले आणि लाखोच्या सुवर्णमुद्रा, चांदीच्या लगडी, हिरे-माणके आणि इतर जड-जवाहिरे लुटून नेले. पुढे जव्हार संस्थानाचे प्रथम शासक महाराज जयबाजीराव मुकणे यांनी इ.स. १३०६ मध्ये भव्य दिव्य अशा श्री महालक्ष्मी मंदिराची निर्मिती केली आनंदोत्सव साजरा करून शास्त्रोक्त पद्धतीने मंदिरात देवीची प्राणप्रतिष्ठा केली. मंदिरामध्ये सुंदर आकर्षक अशी श्री महालक्ष्मीची मूर्ती आहे.

चैत्र नवरात्रीत मातेला ध्वज अर्पण करण्याची परंपरा आहे. जव्हारचे राजे मुकणे यांच्या राजघराण्याचा ध्वज मातेच्या मंदिरात अर्पण केला जातो. हा ध्वज वाघाडी गावचे पुजारी नारायण सातवा यांच्याकडून देवीला अर्पण केला जातो.

प्रतीवर्षी सुगीला शेतात पीक आल्यावर ते पीक वाहून श्री महालक्ष्मीदेवीची पूजा केली जाते. त्यामागील भावना म्हणजे आलेले पीक हे देवीचाच प्रसाद असून जर तो देवीला अर्पण केला, तर घरात आणि शेतात समृद्धी अन् भरभराट येते. सर्वपित्री अमावास्येला येथे आदिवासी समाजाची जत्रा भरते.

४. परिसर आणि संस्कृती 

डहाणू शहर शांत स्वच्छ निवांत समुद्रकिनारे, खळखळून वहाणारी सूर्या नदी, आजूबाजूला पसरलेली हिरवळ, वृक्ष वनराजी, उंच डोंगररांगा, हिरव्यागार चिकूच्या बागा आणि पारंपरिक वारली कला यांसाठी ओळखले जाते. येथे निसर्ग, समुद्र, नदी, डोंगररांगा आणि पारंपरिक संस्कृती एकमेकांत मिसळतात.

निसर्गासह पारंपारिक संस्कृती जपून रहिवास करणारे येथील आदिवासी, कोळी बांधवांसोबत इतर पानमाळी, पारशी समाज आणि ७०-८० च्या दशकामध्ये या परिसरामध्ये पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराचे वारे वाहू लागले. डहाणू आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत आध्यात्मिक क्रांतीने मोठे परिवर्तन झाले. डहाणूच्या सागर किनार्‍यावर स्वाध्याय परिवाराचा प्रयोग असलेल्या १८ ते २० मत्स्यगंधा मोठ्या डौलाने सागर किनार्‍यावर डोलत असतात. नाना महाराज धर्माधिकारी यांची ‘श्री बैठक’ या परिसरामध्ये होत असून हा परिसर आध्यात्मिक प्रवृत्तीने आणि विचाराने रंगून गेला आहे.

– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे