गोव्यात दहावीच्या विद्यार्थ्याने बनवली बनावट गुणपत्रिका !

परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले असूनही बनावट गुणपत्रिकेत ९९ टक्के गुण मिळाल्याचे दाखवले

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, १० एप्रिल (वार्ता.) – गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षेचा निकाल ७ एप्रिल या दिवशी घोषित झाला. गोवा शालांत मंडळाने परिश्रम घेऊन यंदा १० वीचा निकाल उत्तमरित्या आणि विक्रमी वेळेत घोषित केला. याला गालबोट लावण्याचा प्रकार १० वी इयत्तेत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने केला आहे. परीक्षेत ९० टक्के गुण मिळाले असूनही बनावट गुणपत्रिका बनवून ९९ टक्के गुण मिळाल्याचे दाखवले आहे. हा प्रकार गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांना समजल्यानंतर त्यांनी ‘असा प्रकार खपवून घेणार नाही’, असे निर्देश सर्व शाळांना दिले आहेत. बनावट गुणपत्रिका बनवलेल्या या विद्यार्थ्याची संबंधित शाळेच्या माध्यमातून कसून चौकशी केली जात आहे. या प्रकारात तथ्य आढळल्यास संबंधित शाळेला या विद्यार्थ्याच्या विरोधात सायबर पोलिसात तक्रार नोंदवण्याची सूचना अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली आहे.

‘फाँट’मुळे उघडकीस आला प्रकार

राज्यातील एका प्रसिद्ध शाळेतील या विद्यार्थ्याला इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. या विद्यार्थ्याने गोवा शालांत मंडळाच्या गुणपत्रिकेप्रमाणेच संगणकाच्या आधारे बनावट गुणपत्रिका सिद्ध केली आणि यामध्ये स्वत:ला ९९ टक्के गुण मिळाल्याचे दाखवले. गोवा शालांत मंडळाच्या निकालामधील गुणांसाठी वापरण्यात आलेला फाँट आणि बनावट गुणपत्रिकेतील फाँट हा निरनिराळा असल्याने हा प्रकार शाळेचे व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांच्या लक्षात आला आणि त्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला. इयत्ता १० वीची बनावट गुणपत्रिका सिद्ध करण्याचा प्रकार २ वर्षांपूर्वी एकदा अन्य एका विद्यालयात घडला होता.

गोवा शालांत मंडळाची कार्यपद्धत पारदर्शक

गोवा शालांत मंडळाची १० वीचा निकाल घोषित करण्याची कार्यपद्धत पारदर्शक आहे. इयत्ता १० वीचा निकाल गोवा शालांत मंडळाच्या संकेतस्थळाबरोबरच केंद्र सरकारच्या ‘डीजी लॉकर’ या ठिकाणीही उपलब्ध आहे. देशातील अवघ्याच काही राज्यांतील शिक्षण क्षेत्राचे निकाल केंद्र सरकारच्या ‘डीजी लॉकर’वर उपलब्ध असतात.

असे प्रकार खपवून घेणार नाही ! – भगीरथ शेट्ये, अध्यक्ष, गोवा शालांत मंडळ

या प्रकरणी गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये म्हणाले, ‘‘बनावट गुणपत्रिका सिद्ध करण्याचा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. हा प्रकार गोवा शालांत मंडळ कदापि सहन करणार नाही. पालकांनी दहावीचा निकाल शिक्षण खात्याचे संकेतस्थळ किंवा केंद्र सरकारचे ‘डीजी लॉकर’ या ठिकाणावरून डाऊनलोड करावा.’’

संपादकीय भूमिका

  • शिक्षणात नीतीमत्तेची आवश्यकता का आहे ? याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
  • शिक्षणात नीतीमत्ता शिकवली न गेल्यानेच ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळूनही ही फसवणूक करण्याचा विचार विद्यार्थ्याच्या मनात आला. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले असले, तरी नीतीमत्ता नसल्याने या गुणांचे महत्त्व शून्य झाले आहे, हे समाजाने लक्षात घेतले पाहिजे.
  • अशी मुले उच्चशिक्षित होऊन समाजाचे भले काय करणार ? अशा विद्यार्थ्यापेक्षा ५० टक्के गुण मिळालेला; पण प्रामाणिक आणि नीतीवान असलेला विद्यार्थी कधीही चांगला !