गेल्या ७ वर्षांत ५ अधिकार्यांच्या विरोधात कारवाई
पणजी, ९ एप्रिल (वार्ता.) – कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील अधिकार्यांकडूनच बंदीवानांना अमली पदार्थांचा पुरवठा केला जातो. अमली पदार्थांचा पुरवठा केल्याच्या प्रकरणी गेल्या ७ वर्षांत ५ अधिकार्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामधील अनेक अधिकार्यांना प्रारंभी सेवेतून निलंबित करण्यात आले आणि नंतर त्यांना पुन्हा सेवेत रूजू करण्यात आले.
१. कारागृहरक्षक नारायण नाईक याच्याकडे २५ ऑक्टोबर २०१८ या दिवशी चरस हा अमली पदार्थ सापडल्याने त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आणि नंतर पुन्हा सेवेत घेण्यात आले. या प्रकरणी अद्याप अन्वेषण चालू आहे.
२. १३ मार्च २०१९ या दिवशी कारागृहरक्षक शंभू नाईक याच्याकडे गांजा आढळला होता. यानंतर शंभू नाईक याला सेवेतून निलंबित करण्यात आले आणि नंतर त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले.
३. कारागृह महानिरीक्षकांनी २४ ऑक्टोबर २०१९ या दिवशी भारतीय राखीव दलाचे कर्मचारी, कोलवाळ मध्यवर्ती कारागृह साहाय्यक अधीक्षक आणि कारागृह अधिकारी यांच्या साहाय्याने कारागृहावर धाड घातली होती. या वेळी कारागृहातील विविध विभागांमध्ये अमली पदार्थांसह अन्य प्रतिबंधित वस्तू आढळल्या होत्या. या प्रकरणी साहाय्यक कारागृह अधिकारी अंकुश मडकईकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आल. ते निलंबनाच्या काळात सेवानिवृत्त झाले. तसेच कारागृह अधिकारी कृष्णा उसगावकर आणि कारागृहरक्षक केशव गावस यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आणि नंतर त्यांना पुन्हा सेवेत रूजू करण्यात आले.
४. १२ ऑक्टोबर २०२० या दिवशी कारागृहरक्षक रामा कोरगावकर अमली पदार्थाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असतांना भारतीय राखीव दलाच्या सैनिकांनी त्याची झडती घेतली होती. या वेळी त्याच्याकडे गांजा आढळला होता. कोरगावकर याला प्रारंभी सेवेतून निलंबित करण्यात आले आणि नंतर पुन्हा सेवेत रूजू करण्यात आले. कोरगावकर याच्या विरोधात अन्वेषण चालू आहे.
५. २२ जून २०२२ या दिवशी कारागृह अधिकारी सूरज गावडे याची भारतीय राखीव दलाच्या सैनिकांनी झडती घेतली. या वेळी त्याच्याकडे कोकेन सापडले. सूरज गावडे याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे आणि त्याच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट करण्याची प्रक्रिया चालू आहे.
संपादकीय भूमिका
|