Goa Betting On IPL : गोव्यात ‘आय.पी.एल्.’च्या क्रिकेट सामन्यांवरील सट्टेबाजीला ऊत !

आतापर्यंत ४४ जणांसह ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल घेतला कह्यात !

पणजी, ९ एप्रिल (वार्ता.) : देशभरात ‘आय.पी.एल्.’चे क्रिकेट सामने चालू आहेत. गोव्यात या क्रिकेट सामान्यांवरील सट्टेबाजीला ऊत आला आहे. गोवा पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग आणि स्थानिक पोलीस यांनी ‘आय.पी.एल्.’चे क्रिकेट सामने चालू झाल्यानंतर क्रिकेट सट्टेबाजीच्या प्रकरणी आतापर्यंत ६ ठिकाणी कारवाई करत एकूण ४४ जणांना कह्यात घेतले असून  त्यांच्याकडून एकूण ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे.

१. ८ एप्रिल या दिवशी ‘चेन्नई सुपर किंग्ज’ आणि ‘पंजाब किंग्ज’ या संघांमध्ये ‘आय.पी.एल्.’ क्रिकेट सामना चालू होता. या वेळी पोलिसांनी वेर्णा, नागवा, पणजी आणि कळंगुट येथे धाड घालून ३६ जणांना कह्यात घेतले, तसेच त्यांच्याकडून सुमारे १०० हून अधिक भ्रमणभाष, १५ भ्रमणसंगणक (लॅपटॉप), १३० ए.टी.एम्.कार्ड, ९० पासबूक, ५० चेकबूक (धनादेश), असे एकूण ४० लाख रुपयांचे साहित्य कह्यात घेतले.

२. कळंगुट पोलिसांनी ९ एप्रिलच्या रात्री सिकेरी येथे चालू असलेल्या क्रिकेट सट्टेबाजीवर कारवाई करून दोघांना कह्यात घेतले आणि त्यांच्याकडून ९५ सहस्र रुपये किमतीचे साहित्य कह्यात घेण्यात आले.

३. ५ एप्रिल या दिवशीही क्रिकेट सट्टेबाजीच्या प्रकरणी एका ठिकाणावरून ५ जणांना कह्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडून २ लाख ७० सहस्र रुपये किमतीचे साहित्य कह्यात घेण्यात आले.

४. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ४ एप्रिल या दिवशी आल्पपर्वरी येथे, तर त्याच दिवशी पर्वरी पोलिसांनी पर्वरी येथे क्रिकेट सट्टेबाजीच्या विरोधात कारवाई केली.

संपादकीय भूमिका

प्रत्येक वेळी ‘आय.पी.एल्.’च्या क्रिकेट सामन्यांच्या कालावधीत सट्टेबाजीविरुद्ध कारवाई केली तरीही सट्टेबाजी चालूच आहे. त्यामुळे केवळ वरवरची कारवाई अपेक्षित नसून कठोर कारवाई केल्यासच समाजात नैतिकता टिकून राहू शकते !