कोईम्बतूर (तमिळनाडू) येथे पाद्र्याकडून २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

पाद्री जॉन जेबराज

कोईम्बतूर (तमिळनाडू) – येथील पाद्री जॉन जेबराज (वय ३७ वर्षे) याच्याविरुद्ध २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जेबराज येथील किंग्ज जनरेशन चर्चचा पाद्री आहे. पाद्री जेबराज पसार असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी एक पथक सिद्ध केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन जेबराज याने जीएन् मिल्स परिसरातील त्याच्या घरी १४ आणि १७ वर्षे वयाच्या २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. १७ वर्षांची मुलगी अनाथ आहे. तिला पाद्रीच्या सासर्‍यांनी दत्तक घेतले होते, तर १४ वर्षांची पीडित मुलगी त्याच्या शेजारी रहाते. गेल्या वर्षी जॉनच्या घरी एक मेजवानी  आयोजित करण्यात आली होती. दोन्ही पीडित मुली त्यात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. या काळात त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले. पाद्री जेबराज याने या मुलींना ‘घडलेल्या घटनेविषयी कुणाला सांगितल्यास ठार मारीन’, अशी धमकी दिली होती.  तथापि १४ वर्षीय पीडित मुलीने नंतर तिच्या पालकांना घटनेविषयी सांगितले. यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

पोलिसांच्या दृष्टीने पसार असलेला पाद्री जेबराज प्रार्थना सभेला उपस्थित !

विशेष म्हणजे पोलिसांच्या दृष्टीने पाद्री जेबराज पसार असूनही ३१ मार्च या दिवशी चेन्नईमध्ये एका प्रार्थना सभेला उपस्थित राहिला. त्याने त्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवरदेखील प्रसारित केला आहे. (यावरून पोलीस पाद्री जेबराज याला पाठीशी घालत असल्याचे दिसून येते. असे असेल, तर अशा पोलिसांवरही कठोर कारवाई व्हायला हवी !  – संपादक)

संपादकीय भूमिका

पाद्री म्हणजे सभ्य आणि सुसंस्कृत, अशी जी प्रतिमा या देशात निर्माण केली आहे, ती किती पोकळ आहे, हे अशा सातत्याने देश-विदेशांत उघड होणार्‍या घटनांवरून समोर येत आहे; मात्र यावर तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधी तोंड उघडतांना दिसत नाहीत, हे लक्षात घ्या !