चैत्री एकादशीच्या निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा पार पडली !

दर्शनासाठी ६ घंट्यांहून अधिक काळ

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची करण्यात आली पूजा आणि फुलांची आरास

पंढरपूर – चैत्री शुद्ध कामदा एकादशी निमित्त मंदिरे समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीची नित्यपूजा पार पडली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिरे समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजीराव मोरे आणि श्री रुक्मिणीदेवीची नित्यपूजा लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. मंदिरातील श्रींचा गाभारा, सोळखांबी, श्री संत नामदेव पायरी या ठिकाणी विविध फुलांच्या साहाय्याने सजावट करण्यात आली आहे. दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपूर येथे आल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी ६ घंट्यांहून अधिक काळ लागत होता.

दर्शनरांगेत भाविकांना खिचडी वाटप करतांना मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज, तसेच अन्य

दिवसेंदिवस उष्णतेची वाढणारी दाहकता लक्षात घेता, दर्शनरांगेत शीतयंत्र, थंड पिण्याचे पाणी, सरबत, मठ्ठा वाटप करण्यात येत आहे. गतवर्षीप्रमाणे पत्राशेड येथे दशमी, एकादशी आणि द्वादशी दिवशी अन्नछत्र चालू करण्यात आले आहे. भाविकांना पूर्णवेळ साबुदाणा-तांदळाची खिचडी वाटप करण्यात येत आहे. दर्शन रांगेतील एकही भाविक उपाशी राहू नये, या दृष्टीने ‘सारडा भवन’ येथेसुद्धा खिचडी वाटप करण्यात येत आहे.

चंद्रभागा वाळवंट येथे महिला भाविकांना कपडे पालटण्यासाठी खोली आणि दर्शनरांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. वारकरी भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यास मंदिर प्रशासन सज्ज असल्याची माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.