
कणकवली – तालुक्यातील नांदगाव येथील प्रस्तावित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (मार्केट यार्डच्या) पहिल्या टप्प्यातील इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन ११ एप्रिल या दिवशी सकाळी ९.३० वाजता वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे, आणि पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या होणार आहे, अशी माहिती तुळशीदास रावराणे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संचालक मकरंद जोशी, प्रदीप मांजरेकर आदी उपस्थित होते.
रावराणे पुढे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाजार समिती स्थापन होऊन २५ वर्षे झाली; मात्र मुख्य ‘मार्केट यार्ड’ नसल्याने जिल्ह्यातील शेतकर्यांना उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी जागा नव्हती. त्यासाठी बाजार समितीने नांदगाव येथे भूमी घेतली आहे. मार्केट यार्डसाठी आवश्यक असलेल्या इमारतींसाठीचे अंदाजपत्रक ६६ कोटी रुपयांचे झाले आहे. त्यासाठीची मान्यता पणन खात्याचे पुणे येथील संचालकांकडून घेण्यात आली आहे. येथे ६ इमारती अत्यावश्यक असल्याने त्यादृष्टीने अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मार्केट यार्डमध्ये कार्यालयीन इमारती, गोदाम, प्रोसेसिंग युनिट, किराणा माल, फळे, काजू, आंबा, मासळी यांसाठी स्वतंत्र विभाग होणार आहेत. तसेच शेतकर्यांकडून घेतलेला माल ठेवण्यासाठी शीतगृह उभारण्यात येणार आहे. या वेळी पालकमंत्री नितेश राणे, सिंधुरत्न योजना समितीचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.’’