धारबांदोडा येथील वरद सामंत यांच्या शेतीला भेट देऊन प्रशासकीय अधिकार्‍यांकडून कृषी पद्धतींचा अभ्यास

पणजी, ८ एाप्रिल (स.प.) – राज्यातील कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेत लक्षणीय योगदान देते, रोजगार प्रदान करते, उत्पन्न निर्माण करते आणि विशेषतः ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देते, असे धारबांदोडा येथील एक तरुण शेतकरी श्री. वरद सामंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निर्देशानुसार स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमांतर्गत तालुका नोडल अधिकारी आणि ‘स्वयंपूर्ण मित्र’ (स्वयंपूर्ण गोवा मोहिमेअंतर्गत नेमलेले साहाय्यक) यांनी धारबांदोडा येथील श्री. वरद सामंत यांनी त्यांच्या शेतात वापरलेल्या कृषी पद्धती आणि तंत्रज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या शेताला भेट दिली. यामुळे इतर शेतकर्‍यांपर्यंत माहिती आणि ज्ञान पोचवण्यास साहाय्य होईल. युवक यामुळे शेतीचे प्रभावी मार्ग स्वीकारू शकतील आणि राज्यातील शेतीला चालना देऊ शकतील.

श्री. वरद सामंत यांनी त्यांच्या कृषीविषयक उपक्रमांची माहिती दिली आणि नंतर त्यांनी त्यांच्या शेतात वापरलेल्या पद्धती आणि तंत्रज्ञान यांचे प्रात्यक्षिक दाखवले. शेतीचे महत्त्व सांगतांना वरद सामंत म्हणाले, ‘‘शेती हा मानवी संस्कृतीचा आधारस्तंभ बनला आहे. ज्यामुळे अस्तित्व आणि विकास यांसाठी महत्त्वाची संसाधने उपलब्ध झाली आहेत. शेती उपजीविकेस आधार देते, आर्थिक वाढीस चालना देते आणि लोकसंख्येच्या मोठ्या भागासाठी अन्न, कच्चा माल अन् रोजगाराचा प्राथमिक स्रोत बनून समुदायांचे पोषण करते.’’

वाणिज्य शाखेतील पदवीधर असलेले श्री. वरद सामंत गाजर, टोमॅटो, भेंडी आणि खरबूजदेखील पिकवतात. त्यांचे भाज्यांचे

९० टक्के उत्पादन सेंद्रिय शेती पद्धतीने आहे. वरद सामंत यांच्यासारखे गोव्यात पुरेसे तरुण, उत्साही, प्रशिक्षित आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणारे शेतकरी असतील, तर गोव्याचे भाज्यांमध्ये स्वयंपूर्ण होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते.