नाटकावर बंदी आणण्यासाठी पोलीस स्थानकात निवेदन
कुडाळ – सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘भटांची बायपास’या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात होत आहेत. या नाटकामध्ये ब्राह्मण समाजातील मुली आणि स्त्रिया यांची टिंगल टवाळी करण्यात आली असून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे लिखाण केले गेले आहे. या नाटकावर तात्काळ बंदी आणून नाट्यप्रयोग करण्यास मनाई करण्यात यावी, तसेच समाजात ब्राह्मण समाजाविषयी द्वेष पसरवणारे लिखाण, वक्तव्ये आणि प्रसारण थांबवण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, सिंधुदुर्गच्या कुडाळ शाखेने कुडाळ पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र ब्राह्मण सभेनेही याला पाठिंबा दर्शवला आहे.
कुडाळ शाखेचे अध्यक्ष मनोहर म्हैसकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. या वेळी मंजुनाथ फडके, संदिप मणेरीकर, विघ्नेश गोखले, शशांक जडये, गरुनाथ दामले, प्रकाश कुंटे, उमा जडये, गौरी दामले, विक्रम जांभेकर, राजन नाईक, अनिकेत वालावलकर आदी उपस्थित होते
या नाटकासह चित्रपट, नाटके, तसेच सामाजिक माध्यमातून (सोशल मीडियातून) ब्राह्मण समाजाची करण्यात येणारी अपकीर्ती, समाजासमोर ब्राह्मण समाजाविषयी द्वेष निर्माण होईल, असे चित्रीकरण, लिखाण, वक्तव्य करणे थांबणे आवश्यक आहे. न थांबल्यास शांत आणि संयमी अशा ब्राह्मण समाजाविषयी इतर समाजात नाहक द्वेष भावना वाढेल आणि सामाजिक सलोखा बिघडेल. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी या नाटकाचे प्रयोग येत्या काळात होणार आहेत. कुडाळमध्येही या नाटकाचे प्रयोग होण्याची शक्यता आहे. हे नाटक झाल्यास ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. यासाठी पोलीस प्रशासनाने याची आधीच नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.