बांगलादेशाने कोलकाताजवळील बंदराचे विस्ताराचे दायित्व चीनला दिले !

पाकिस्तानच्या सहकार्याने वायूदलाच्या तळाची निर्माती

महंमद युनूस आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाने(Bangladesh) कोलकातापासून केवळ २०० कि.मी. अंतरावर असलेल्या मोंगला बंदराच्या विस्ताराचे दायित्व चीनला दिले आहे. बांगलादेशाचे अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनूस यांच्या नुकत्याच झालेल्या चीन दौर्‍याच्या वेळी या संदर्भात करार करण्यात आला. या बंदराच्या विकासासाठी चीनने अनुमाने ३ सहस्र ३०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.

१. यासह बांगलादेश सरकार लालमोनिरहाट जिल्ह्यात एक वायूदलासाठी तळ बांधत आहे, जो भारताच्या ‘चिकन नेक’, म्हणजेच सिलिगुडी कॉरिडॉरपासून (बंगालमध्ये असणारे अनुमाने २२ किलोमीटर लांबीचा अत्यंत अरुंद भूभाग. ईशान्येकडील ७ राज्यांना उर्वरित भारताशी जोडणारा हा एकमेव भूमार्ग आहे.) केवळ १२० कि.मी. अंतरावर आहे. या तळासाठी बांगलादेशी वैमानिकांना पाकिस्तानात पाठवले जात आहे, जेणेकरून ते पाकिस्तानमध्ये असणारी ‘जेएफ्-१७’ ही अमेरिकी बनावटीची लढाऊ विमाने उडवायला शिकू शकतील. २७ मार्चला ५ वैमानिकांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे.

२. चीनने बांगलादेशाला आधीच पाणबुड्या दिल्या असून तो आता बंगालच्या उपसागरात त्याची उपस्थिती भक्कम करत आहे. चितगाव विद्यापिठातील आंतरराष्ट्रीय घडामोडींचे प्राध्यापक डॉ. फरीदुल आलम म्हणाले की, आजच्या काळात कोणत्याही मोठ्या शेजारी देशाशी शत्रुत्व राखून काहीही लाभ नाही. युनूस सरकारने भारतासमवेत शांतता राखावी, अन्यथा बांगलादेशाचीच हानी होईल.

संपादकीय भूमिका

बांगलादेशाविरोधात भारत कधी सक्रीय होणार ?