कर्नाटक विधान परिषदेच्या माजी सदस्या डॉ. एस्.आर्. लीला : हिंदु संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य करणार्‍या आधुनिक रणरागिणी !

विशेष सदर

डॉ. एस्.आर्. लीला या कर्नाटक विधान परिषदेच्या माजी सदस्या, भाजप नेत्या, संस्कृत विद्वान, प्रसिद्ध कन्नड लेखिका, स्तंभलेखिका, शिक्षणतज्ञ, संस्कृत नाटक आणि चित्रपट दिग्दर्शिका, तसेच ‘लीला जाल’ या यू ट्यूब चॅनेलच्या संचालिका आहेत. त्यांनी साहित्य, व्याख्याने आणि सामाजिक कार्य यांद्वारे भारतीय संस्कृती, हिंदु धर्म अन् मंदिरे यांचे संरक्षण आणि संवर्धन यांच्यासाठी प्रेरणादायी कार्य केले आहे.

डॉ. एस्.आर्. लीला

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल ! – संपादक

१. शिक्षण

डॉ. लीला यांचा जन्म १७ जानेवारी १९५० या दिवशी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मालूर तालुक्यातील संपंगेरे गावात झाला. त्यांनी संस्कृतमध्ये एम्.ए., एम्.फिल. आणि पीएच्.डी. पदव्या संपादन केल्या. ‘एन्.एम्.के.आर्.व्ही. महिला महाविद्यालया’त संस्कृत विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका म्हणून त्या निवृत्त झाल्या, तसेच केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण विभागातील ‘भारतीय तत्त्वज्ञान संशोधन परिषद’ अन् ‘सांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्र’ या समित्यांच्या सदस्या म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.

२. साहित्य क्षेत्रातील योगदान

अ. डॉ. एस्.आर्. लीला यांनी संस्कृत आणि कन्नड साहित्याच्या माध्यमातून भारतीय मूल्यांवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी कन्नड, संस्कृत आणि इंग्रजी भाषांमध्ये अनेक उत्कृष्ट ग्रंथांची रचना केली आहे. त्यांच्या लेखणीमुळे हिंदु धर्मातील मौल्यवान तत्त्वे, संस्कृती आणि परंपरेचे प्रवाह वाचकांचे मन प्रफुल्लित करते. देश-विदेशातील विविध संस्कृत संमेलनांमध्ये त्यांनी भारतीय परंपरा आणि इतिहास यांवर निबंध सादर केले आहेत.

आ. ‘वीर सावरकर संघा’च्या विश्वस्त म्हणून त्यांनी सावरकर साहित्याच्या १० खंडांच्या प्रकाशनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यासह वीर सावरकर यांच्या ‘भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने’ आणि ‘हिंदुपदपादशाही’ या प्रसिद्ध ग्रंथांचे कन्नडमध्ये भाषांतर केले आहे.

इ. डॉ. आंबेडकर यांच्या ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या इंग्रजी पुस्तकाचे ‘हिंदूंना हिंदुस्थान, मुसलमानांना पाकिस्तान’ या शीर्षकाखाली कन्नडमध्ये भाषांतर केले आहे. यामध्ये भारताच्या फाळणीच्या वेळी झालेल्या दुर्दैवी घटना आणि त्या वेळचा ‘लोकसमुदाय विनिमय’ प्रस्ताव यांविषयी सखोल माहिती दिली आहे. या भाषांतराद्वारे त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या दूरदृष्टीची ओळख करून दिली आहे. ‘दूरदृष्टी असलेल्या बाबासाहेबांना भारतियांनी वंदन केले पाहिजे’, असे डॉ. एस्.आर्. लीला म्हणतात.

३. संस्कृत भाषेत चित्रपट आणि नाटक यांची रचना

त्यांनी संस्कृत भाषेत चित्रपट आणि नाटक यांची रचना, निर्मिती अन् दिग्दर्शन केले आहे. महर्षि पाणिनींवर आधारित चित्रपट सिद्ध करून त्यांनी संस्कृत व्याकरणाच्या तज्ञांना प्रथमच चित्रपटाच्या माध्यमातून सादर केले आहे. सध्या कमळ पुष्पाच्या महत्त्वावर आधारित ‘पद्मगंधी’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत, जो लवकरच प्रदर्शित होणार आहे.

४. सामाजिक आणि धार्मिक कार्य

डॉ. लीला यांनी हिंदु धर्माच्या सखोल अध्ययनासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी, तसेच प्रसारासाठी स्वतःचे जीवन समर्पित केले आहे. त्यांनी हिंदु जनजागृती समिती आयोजित अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात सहभागी होऊन साम्यवाद्यांच्या वैचारिक आक्रमणांविरुद्ध प्रभावीपणे विषय मांडला आहे. विविध प्रतिष्ठित मंचांद्वारे ‘सनातन धर्म संरक्षण’ या विषयावर जनजागृती करत आहेत. त्यांनी त्यांच्या जन्मगावी, म्हणजेच संपंगेरेमध्ये आमदार विकास निधी आणि स्वतःच्या खर्चातून एक शासकीय शाळा बांधली आहे. त्यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून समाजात दुर्लक्षित राहिलेल्या काही व्यक्तींना डॉ. लीला यांच्या आईच्या नावाने ‘चुडामणी’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

५. सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून धर्मजागृती

सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून धर्मजागृती निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ‘लीला जाल’ या कन्नड यू ट्यूब चॅनेलद्वारे त्या धार्मिक आणि सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत आहेत. सहस्रो लोक या चॅनेलचे सदस्य आहेत. विशेषतः हिंदुविरोधी घटनांविषयी सतत जागरूकता निर्माण करण्याचे कार्य त्या सातत्याने करत आहेत.

६. राजकीय जीवन

कर्नाटक विधान परिषदेच्या माजी सदस्या आणि भाजप नेत्या म्हणून डॉ. लीला यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांनी राजकीय जीवनात ग्रामीण भागांच्या विकासासाठी शाळा, इमारती, रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधांवर भर दिला आहे.

७. डॉ. एस्.आर्. लीला यांना ‘आर्यभट’ पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

डॉ. एस्.आर्. लीला यांनी केलेली काही परखड विधाने


अ. साम्यवादी विचारसरणी राष्ट्रहिताला हानीकारक :
साम्यवाद्यांच्या नकारात्मक विचारसरणीच्या प्रभावामुळे देशात हत्याकांडे झाली. कार्ल मार्क्सच्या ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’मधील (साम्यवादी घोषणापत्रामधील) विचारांमध्ये अडकलेल्या लोकांनी भारतात साम्यवाद आणला. साम्यवादी विचारसरणी राष्ट्रहिताला हानीकारक आहे. वर्ष १९८० च्या दशकात बर्‍याच देशांतील साम्यवाद संपुष्टात आला. रशियातील साम्यवादही संपुष्टात आला. चीनने जरी साम्यवादावर आधारित राज्यपद्धत चालू ठेवली असली, तरी त्याने त्याची मूळ संस्कृती जपली आहे. साम्यवादी विचारसरणी ही भारतीय आचार-विचारांच्या विरुद्ध आहे.

आ. रामायणाची शिकवण : मुसलमान हे मुळातच पुष्कळ आक्रमक आहेत. हिंदु-मुसलमान एकत्र नांदणे अशक्य आहे. ‘भारताची विभागणी करायची असेल, तर १०० टक्के मुसलमानांनी पाकिस्तानमध्ये जावे आणि हिंदुस्थान हिंदूंसाठी राहू दे’, असे मत डॉ. आंबेडकर यांनी मांडले होते. आपल्याशी सद्भावाने वागणार्‍या व्यक्तीशीच आपण सद्भावाने वागले पाहिजे. दुष्टवृत्तीने वागणार्‍यांपासून सज्जनांचे रक्षण केलेच पाहिजे, ही रामायणाची शिकवण आहे.

इ. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिलेला इतिहास अभ्यासणे आवश्यक ! : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे व्यक्तीमत्त्व महान आहे. त्यांचे जीवन आणि कर्तृत्व स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील असून ते इतिहासकारही आहेत. भारतावर परकियांनी अनेक वेळा आक्रमण केले. आक्रमणकर्त्यांचा काळ अत्यंत क्रौर्याचा होता. ते रानटी होते. भारतियांना आक्रमकांच्या हातून पुष्कळ त्रास सहन करावा लागला. आक्रमणकर्त्यांनीही इतिहास लिहिला. जेव्हा ते इतिहास लिहितात, तेव्हा स्वाभाविकपणे ते त्यांच्या दृष्टीकोनातून लिहितात; पण केवळ वीर सावरकर यांनीच इतिहास हिंदूंच्या दृष्टीकोनातून लिहिला आहे. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.

ई. खोट्या कथानकांविरुद्धचा लढा ! : सध्याच्या काळात ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) हा शब्द पुष्कळ चर्चेत आणि सध्या सर्वत्र प्रचलित आहे. ‘नॅरेटिव्ह’ हा आधुनिक विदेशी शब्द आहे. जगातील सर्व विचित्रता, विकृती आणि मानसिक विकार यांसाठी तेथीलच इंग्रजी भाषेत शब्द निर्माण केले जातात. ‘नॅरेटिव्ह’च्या माध्यमातून एखादा खोटा विचार, भावना, संवाद किंवा वक्तव्य लोकांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. ते एक कपोलकल्पित कथानक असते आणि हेतूपुरस्सर निर्माण केले जाते. बुद्धीमान लोक हे ‘नॅरेटिव्ह’ सिद्ध करतात आणि अन्य त्याला प्रसारित करतात. पुढे हे ‘नॅरेटिव्ह’ हळूहळू वाढत जाते आणि लोकांच्या मनात भ्रम निर्माण करते. लोक त्यालाच सत्य समजायला लागतात. ‘खोटे बोल; पण रेटून बोल’, अशी एक म्हण आहे. अशा प्रकारच्या ‘नॅरेटिव्ह’मधील द्वेष आणि धोके दाखवून देऊन विरोध केला नाही, तर देशाचा विनाश ठरलेला आहे.

डॉ. एस्.आर्. लीला यांनी सनातन संस्थेविषयी काढलेले गौरवोद्गार –

हिंदु धर्माचे कल्याण आणि संवर्धन यांसाठी सनातन संस्थेचे योगदान मोठे !

डॉ. एस्.आर्. लीला

अत्यंत उत्कृष्टपणे कार्य करणार्‍या सनातन संस्थेचे मी आभार मानते. सनातन संस्था पुष्कळ चांगले काम करत आहे. तसे पहायला गेले, तर ही सनातन संस्था काय आहे ? सनातन म्हणजे शाश्वत; म्हणून ते हिंदु धर्माच्या शाश्वत स्वरूपाच्या रक्षणासाठी शाश्वत रूपात कार्य करत आहेत. सनातन धर्म हा या देशाचा, म्हणजेच भारताचा, हिंदुस्थानचा धर्म आहे; पण सनातन धर्माचा आदर करणार्‍यांची संख्या पुष्कळ न्यून आहे. सनातन धर्म मानणारे लोक मोठ्या संख्येने आहेत, हे ठाऊक असूनही खर्‍या अर्थाने या धर्माला समजून घेणारे, त्याचे कौतुक करणारे आणि त्याची पूजा करणारे लोक पुष्कळ अल्प आहेत. त्यामुळे सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि उन्नतीसाठी ज्यांनी स्वतःचे जीवन पूर्णपणे समर्पित केले आहे, सनातन धर्माच्या उन्नतीसाठी जे प्रयत्न करत आहेत, त्यांचे मनापासून अभिनंदन करायलाच हवे अन् त्या सर्व सनातन लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी.

आज आपण सर्वजण पहात आहोत की, सनातन धर्मावर अनेक लोक आघात करत आहेत. असे असतांना सनातन संस्थेने धर्मरक्षणाचे कार्य स्वतःचे मानून स्वतःला पूर्णपणे या कार्याशी एकरूप करून घेतले आहे. वास्तविक पहाता सनातन धर्म हा पुष्कळ सुंदर विचारसरणीचा धर्म आहे. ‘हा धर्म केवळ हक्कांविषयीच नाही, तर तुम्ही तुमची कर्तव्ये पार पाडली पाहिजेत’, हे शिकवतो. तेच सनातन संस्था तिच्या आचरणातून, प्रकाशनांमधून आणि साधकांकडून करून घेत आहे. अनेक लोक आपापल्या परीने सनातन धर्माचे कल्याण आणि संरक्षण यांसाठी स्वतःचे योगदान देत आहेत. त्यामुळे सनातन धर्माच्या रक्षणासाठी प्रयत्न करणार्‍या सनातन संस्थेचे अभिनंदन केले पाहिजे, असे मला मनापासून वाटते आणि संस्थेच्या या महान कार्याचा आपण सर्वांनी पुष्कळ आदर केला पाहिजे.