इस्रायली अमली पदार्थ व्यावसायिक अटाला याला भाडेकरू म्हणून ठेवणार्‍या सदनिकेच्या मालकावर गुन्हा नोंद

म्हापसा, १२ एप्रिल (वार्ता.) – कुप्रसिद्ध अमली पदार्थ व्यावसायिक अटाला उपाख्य यानिव्ह बेनाहीम या इस्रायली नागरिकाला शिवोली येथील एका सदनिकेत भाडेकरू म्हणून ठेवतांना विदेशी विभागीय नोंदणी कार्यालयात कळवले गेले नसल्याने सदनिकेचा मालक परम उल्हास वार्टी यांच्या विरोधात हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

अमली पदार्थ व्यावसायिक अटाला हा गेले ४ मास शिवोली येथील ‘कासा ज्युलियाना अपार्टमेंट’ येथे अनधिकृतपणे रहात होता. विदेशी नागरिक भाडेकरू असेल, तर संबंधित व्यक्तीने विदेशी विभागीय नोंदणी कार्यालयाकडे ‘सी’ अर्ज भरणे बंधनकारक आहे; मात्र सदनिकेच्या मालकाने हा अर्ज भरला नव्हता. यामुळे विदेशी नागरिक कायद्याचे कलम १४ (क) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हणजूण पोलिसांनी अटाला याला ११ एप्रिल या दिवशी कह्यात घेतले होते. तत्पूर्वी अटाला याला गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कह्यात घेऊन त्याच्याकडून ८ लाख ७० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले होते. पोलिसांना अटाला याचे अन्वेषण करतांना त्याच्याकडे आधारकार्ड सापडले होते. पोलिसांनी आधारकार्डसंबंधी सविस्तर माहिती देण्याची मागणी आधारकार्ड देणारी संस्था ‘यु.आय.डी.ए.आय्.’ (युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया) या संस्थेकडे केली होती. आधारकार्ड मिळवतांना अटाला याने कोणती कागदपत्रे सादर केली, याविषयी माहिती पोलिसांना पाहिजे होती; मात्र संस्थेने ही माहिती देण्यास नकार दर्शवला होता. यामुळे पोलीस मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाकडे याचिका प्रविष्ट करणार आहे.