
पुणे, ८ एप्रिल (वार्ता) – श्रीराम मंदिर, जेजुरी येथे रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मंदिर विश्वस्तांनी हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून ‘श्रीरामाचे अवतार कार्य आणि साधनेचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच विनामूल्य वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थानाचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज देहूकर आणि विश्वस्त हभप माणिक महाराज देहूकर यांच्या हस्ते झाले. महागणपती रांजणगावचे विश्वस्त डॉ.तुषार पाचुंदकर, डॉ. राजेंद्र खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर व प्रतिष्ठितांची उपस्थिती यावेळी होती. १६० पेक्षा अधिक भाविकांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. सनातनच्या सात्विक उत्पादन आणि ग्रंथांचाही सर्वांनी लाभ घेतला.
हभप पुरुषोत्तम महाराज देहूकर यांनी सांगितले की, हिंदु जनजागृती समितीचे कार्य खूप मोठे आहे. मी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून ओझर येथील मंदिर परिषदेत आलो होतो. समिती आणि मंदिर महासंघाच्या या कार्यात आमचा सहभाग नेहमी राहिल.
भूकुम (पुणे) येथील रामनवमी निमित्त विशेष प्रवचनाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद !

रामनवमीला भूकुम (पुणे) येथील ‘स्की टाउन सोसायटी’मध्ये विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. सोसायटीच्या अध्यक्षांनी रामनवमीच्या निमित्ताने रामरक्षा स्तोत्राचा अर्थ आणि भगवान श्रीरामांविषयी मार्गदर्शन करण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत, सुप्रसिद्ध प्रवचनकार श्रीमती शीला जहागीरदार यांनी उपस्थित भाविकांना संबोधित केले. या कार्यक्रमाला १५० हून अधिक भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
त्यांनी धर्म शिक्षणाचे महत्त्व विशद केले. तसेच त्यांनी रामरक्षा स्तोत्राचा अर्थ सोप्या शब्दांत समजावून सांगितला. उपस्थितांनी एकत्रितपणे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा नामजप केला. प्रवचनाच्या समाप्तीनंतर सर्वांनी मिळून रामरक्षा स्तोत्राचे पठण केले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘सोसायटी’च्या वतीने श्रीमती शीला जहागीरदार यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
वैशिष्ट्यपूर्ण:
१. प्रवचन झाल्यानंतर अनेक जणांनी नियमित प्रवचन घ्यावे अशी विनंती केली.
२. प्रवचन झाल्यानंतर समितीच्या धर्मशिक्षण बैठकीला येणारे व शेजारील सोसायटीच्या अध्यक्षानी त्यांच्या सोसायटी मध्ये बोलावले. तेथील अंदाजे २० तरुणांना एकत्रित करून धर्मशिक्षणाची माहिती सांगण्यास सांगितली.