वाघेरी, कणकवली येथे पहिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे भूमीपूजन

कणकवली – महाराष्ट्र शासन शेतकर्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारे शासन आहे. शेतकरी श्रम करून पीक घेतो. शेतकर्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक बाजार समिती किंवा उपबाजार समिती स्थापन करावी, असा शासनाचा संकल्प आहे. बाजार समितीच्या माध्यमातून मालाला योग्य भाव मिळणार असल्याने शेतकर्यांच्या उन्नतीमध्ये बाजार समितीची भूमिका महत्त्वपूर्ण राहील, असे उद्गार महाराष्ट्राचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी काढले.
तालुक्यातील वाघेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे भूमीपूजन ११ एप्रिलला पणनमंत्री जयकुमार रावल आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते, तसेच खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
या वेळी मंत्री रावल पुढे म्हणाले, ‘‘राज्यात एकूण ३०५ बाजार समित्या आणि ६६२ उपबाजार समित्या आहेत. सव्वा लाख कोटी रुपयांची उलाढाल या वेगवेगळ्या बाजार समितींच्या माध्यमातून होते. वाघेरी येथे बाजार समितीच्या इमारतीचे १८ महिन्यांमध्ये काम पूर्ण होणार आहे. या इमारतीमध्ये फळे, धान्य, काजू बी आदी साठवण्यासाठी गोदाम, मत्स्य उत्पादनासाठी कोल्ड स्टोरेज, व्यापारी भवन, दुकानगाळे, पाण्याची सुविधा, शेतकरी भवन, हमाल भवन आणि इतर सार्या व्यवस्था असणार आहेत. काजू महामंडळाद्वारे जवळपास ३७० कोटी रुपयांचा प्रकल्प चालू करण्यात येणार आहे. पणन महामंडळाद्वारे घेतला जाणारा ‘आंबा महोत्सव’ यावर्षी कोकणात घेतला जाईल.’’
या वेळी मंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर आदींनी त्यांचे विचार व्यक्त केले.
मालवण येथे ‘हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्रा’ला मान्यता देण्याची मागणीपणन मंडळाच्या माध्यमातून मालवण येथे आधुनिक ‘हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्रा’ला मान्यता मिळावी, अशी मागणी आमदार नीलेश राणे यांनी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली. जिल्हा दौर्यावर आलेल्या मंत्री रावल यांना याविषयीचे निवेदन देण्यात आले. याला मंत्री रावल यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. |