कुंभवडे येथे जाणारी बस न सोडल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन
कणकवली – एस्.टी.च्या येथील आगारातून सुटणारी कणकवली-कुंभवडे बस १२ एप्रिल या दिवशी न सोडल्याने कुंभवडे विद्यालयातील विद्यार्थी आणि पालक यांनी बसस्थानकातून सुटणार्या अन्य बस रोखून धरल्या. यामुळे या आगारातून सुटणार्या अन्य गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. अखेर आगाराचे व्यवस्थापक अजय गायकवाड यांनी कुंभवडेला जाणारी बस उपलब्ध करून दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. या प्रकारामुळे कणकवली बसस्थानकात काही काळ वातावरण तंग झाले होते.
कणकवली आगारातून कणकवली-कुंभवडे ही बस नियमित सोडली जाते; मात्र गेले काही दिवस शनिवारी ही बस अनियमित सोडली जाते. याविषयी आगार व्यवस्थापनाकडे कळवूनही त्यात सुधारणा झाली नाही. त्यातच १२ एप्रिलला सकाळी कणकवली-कुंभवडे बससाठी विद्यार्थी स्थानकात आले; मात्र सकाळी ६ वाजता प्रतिदिन सुटणारी बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी अन्य गाड्या रोखून धरल्या. गाड्यांचे नियोजन करण्यात अडचण आल्याने ही समस्या उद्भवल्याचे आगार व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.