|
पणजी, १२ एप्रिल (वार्ता.) – गोवा हे पर्यटनस्थळ पार्टी करण्याचे ठिकाण आणि कॅसिनो असलेले ठिकाण म्हणून कुप्रसिद्ध आहे. याला आता क्रिकेट सट्टेबाजीची जोड मिळाली आहे. गोव्यात हल्लीच्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजी मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे उघडकीस आले आहे. क्रिकेट सामन्यांच्या वेळी सट्टेबाजी करणारे गोवा हेच ठिकाण का निवडतात ? असा प्रश्नही सध्या उपस्थित झाला आहे.
पणजी पोलिसांनी ११ एप्रिलच्या रात्री पणजी येथील एका हॉटेलमध्ये सध्या चालू असलेल्या ‘आय.पी.एल्.’ क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांवर चालू असलेल्या सट्टेबाजीच्या विरोधात कारवाई केली. या वेळी मनीषकुमार कृष्नानी, गोपाळबाई कोक्रा, संदीप पंजवानी आणि जितेंद्र करमानी यांना कह्यात घेण्यात आले अन् त्यांच्याकडून ६ भ्रमणभाष संच, १ भ्रमण संगणक आणि इतर साहित्य मिळून एकूण ४ लाख १० सहस्र रुपये किमतीचा ऐवज कह्यात घेण्यात आला. गोवा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे क्रिकेट सट्टेबाजीवर कारवाई करतांना ४४ जणांना कह्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे ४५ लाख रुपयांचा ऐवज कह्यात घेतला होता. वर्ष २०२५ मध्ये पोलिसांनी एकूण ७ गुन्हे नोंदवले आहेत आणि एकूण ७४ लोकांना कह्यात घेतले आहे. गतवर्षी एप्रिल मासात गोवा पोलिसांनी क्रिकेट सट्टेबाजीच्या विरोधात कारवाई करतांना १६ जणांना कह्यात घेतले होते. वर्ष २०२० मध्ये अशा प्रकारे एका ठिकाणी धाड टाकून सुमारे १ कोटी रुपयांचे साहित्य कह्यात घेण्यात आले होते.
विशेष म्हणजे क्रिकेट सामन्यांच्या वेळी सट्टेबाजी करणारे बहुतांश जण हे गोव्याबाहेरून आलेले आहेत. गोवा हे एक पर्यटनस्थळ असल्याने येथे अवैध कामांवर पोलिसांचे अधिक लक्ष नसते, अशी भावना संबंधितांमध्ये असावी, असे तज्ञांचे मत आहे. क्रिकेट सट्टेबाजीचा अड्डा एखाद्या भाड्याने घेतलेला निर्जनस्थळी असलेला व्हिला किंवा बंगला यांमध्ये असतो. हे बंगले किंवा व्हिला ‘गेस्ट हाऊस’ या नात्याने पर्यटन खात्याकडे नोंद केलेले नसतात. हा व्यवसाय अवैधपणे चालू असतो. सर्वसामान्य पर्यटन म्हणून येऊन येथे सट्टेबाजीचा अड्डा चालवला जातो. सट्टेबाजी करणारे प्रथम अॅपची लिंक सामाजिक माध्यमातून इच्छुकाला पाठवतात. यानंतर बँकची माहिती पाठवून इच्छुकाकडून पैसे जमा करून घेतले जातात आणि त्यानंतर इच्छुक सट्टेबाजी करू शकतो. इच्छुकाला यासाठी ‘कस्टमर आयडी’ दिला जातो.