भ्रमणसंगणकाच्या कळफलकाची बटणे चालू होत नसतांना त्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर कळफलकाची बटणे चालू होणे

‘मी वापरत असलेल्या भ्रमणसंगणकाच्या (लॅपटॉपची) कळफलकाची (कीबोर्डची) बटणे चालू होत नव्हती. तेव्हा अभियंत्याने मला ‘ऑपरेटिंग सिस्टिम’ (Operating System – संगणकाचे मूलभूत नियंत्रण करणारी संगणकीय प्रणाली) अद्ययावत् करून दिली. त्या वेळी काही दिवस कळफलकाची बटणे चालू स्थितीत होती; परंतु नंतर पुन्हा कळफलकाची बटणे चालू होत नव्हती. तेव्हा भ्रमणसंगणकासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर कळफलकाची बटणे लगेच चालू झाली. 

१. ‘भ्रमणसंगणकाची ‘ऑपरेटिंग सिस्टिम’ अद्ययावत करूनही काही दिवस भ्रमणसंगणकावरील कळफलकाची बटणे नीट चालणे आणि नंतर पुन्हा कळफलकाची बटणे बंद पडणे 

‘मी सेवा आणि कार्यालयीन काम भ्रमणसंगणकाच्या साहाय्याने करते. सप्टेंबर २०२४ मध्ये माझ्या वैयक्तिक भ्रमणसंगणकावरील कळफलकाची काही बटणे नीट चालत नव्हती. त्याविषयी मी भ्रमणसंगणक अभियंत्याला (इंजिनीयरला) विचारले. त्याने ‘ऑपरेटिंग सिस्टिम’ अद्ययावत नसल्यामुळे असे होऊ शकते’, असे मला सांगितले. त्या अभियंत्याने मला ‘ऑपरेटिंग सिस्टिम’ अद्ययावत करून दिली. काही दिवस कळफलकाची बटणे नीट चालली; परंतु नंतर पुन्हा बंद पडली.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हस्तलिखित असलेली पट्टी कळफलकावर रात्रभर ठेवल्यावर सकाळी बटणे चालू होणे

‘माझा भ्रमणसंगणक जुना असल्यामुळे कळफलकाची बटणे बंद पडत आहेत’, असे मला वाटले. मी कळफलक पालटण्याचा विचार करत होते. एक दिवस माझ्या मनात ‘गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) हस्तलिखित असलेली पट्टी कळफलकाच्या बटणावर ठेवावी’, असा विचार आला. मी तसे केल्यावर २ – ३ घंट्यांनी कळफलकाची बटणे चालू झाली. मी दुसर्‍या दिवशी कळफलकावर रात्रभर गुरुदेवांचे हस्तलिखित असलेली पट्टी ठेवल्यावर कळफलकाची बटणे चालू होत असत. असे सतत १ आठवडा होत होते. त्यानंतर मी ‘भ्रमणसंगणकासाठी काही आध्यात्मिक स्तरावरील उपाय करता येतील का ?’, असे उत्तरदायी साधकाला विचारले.

३. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर भ्रमणसंगणकाची कळफलकावरील बटणे व्यवस्थित चालू होणे

माझ्या भ्रमणसंगणकाची कळफलकावरील बटणे बंद पडणे, या संदर्भात माझे सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्याशी बोलणे झाले. तेव्हा त्यांनी मला तुझ्या ‘भ्रमणसंगणकावर त्रासदायक शक्तीचे आवरण आले आहे’, असे सांगितले. त्यासाठी त्यांनी मला पुढील आध्यात्मिक उपाय करायला सांगितले.

अ. भ्रमणसंगणकावरील आवरण हाताने खेचून काढणे, तसेच उदबत्तीने आवरण काढणे.

आ. रिकाम्या खोक्यामध्ये भ्रमणसंगणक ठेवून त्याच्या तिन्ही बाजूंनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तलिखित पट्ट्या घालून रात्रभर कळफलकावर ठेवणे.

मी भ्रमणसंगणकाच्या कळफलकावरील बटणे चालू होण्यासाठी वरील आध्यात्मिक उपाय १ आठवडा केले. त्यानंतर कळफलकावरील  बटणे व्यवस्थित चालू झाली. ‘यातून गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे महत्त्व लक्षात आणून दिले’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. प्रियांका प्रभुदेसाई, ठाणे (७.१.२०२५)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक