Roza On Road Outside Maharashtra Assembly : अर्थसंकल्पीय अधिवेशनकाळात विधीमंडळाच्या बाहेर रोजा सोडण्यासाठी अडवला जात आहे पादचारी रस्ता !

पदपथावर रोजा सोडतांना मुसलमान

मुंबई, ११ मार्च (वार्ता.) – अर्थसंकल्पासारखे विधीमंडळाचे महत्त्वाचे अधिवेशन चालू असल्यामुळे एकीकडे विधीमंडळाच्या इमारत आणि परिसर येथे मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे मात्र विधीमंडळाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच हाकेच्या अंतरावरील पादचारी मार्ग नियमित रोजा सोडण्यासाठी तब्बल १ घंटा अडवला जात आहे. कुणाच्या धार्मिक कार्यक्रमाला कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही; मात्र विधीमंडळासारख्या संवेदनशील आणि अतीमहत्त्वाच्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचा रस्ता अडवून कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण करणे, हा विषय अतिशय गंभीर आहे. भविष्यात ही प्रथा पडल्यास किंवा अन्य धर्मियांनीही हा रस्ता अडवून त्यांचा धार्मिक कार्यक्रम केल्यास ते निस्तरणे सरकारला कठीण होऊ शकते.

विधीमंडळाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर असलेल्या डॉ. उषा मेहता चौकात येस बँकेच्या बाजूला असलेला पादचारी मार्ग रमझान चालू झाल्यापासून नियमित सायंकाळी रोजा सोडण्यासाठी अडवला जात आहे. सायंकाळी ६ वाजता या पादचारी मार्गावरच फलाहार ठेवून तेथे बैठका अंथरून अनेक मुसलमान रोजा सोडण्याचा कार्यक्रम करत आहेत. यामुळे १ घंट्याहून अधिक काळ हा पादचारी मार्ग पूर्णपणे बंद ठेवला जातो. या मार्गावरून चालणारे पादचारी, तसेच येथे असलेले छोटे-मोठे व्यावसायिक यांना यामुळे अडचण येत आहे.

विधीमंडळाच्या सुरक्षाव्यवस्थेतील पोलिसांनी दायित्व झटकले !

विधीमंडळासारख्या संवेदनशील आणि अतीमहत्त्वाचा परिसरातील पदपथ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात ‘रोजा’ सोडण्यासाठी बंद करण्यात येत असल्याचे तेथे तैनात असलेल्या पोलिसांना ‘सनातन प्रभात’ने निदर्शनास आणून दिले. त्या वेळी ‘आम्ही विधीमंडळाच्या सुरक्षेसाठी आहोत. पदपथाचा विषय स्थानिक पोलिसांकडे येतो’, असे सांगून पोलिसांनी विषय झटकला. (एका पत्रकाराला अशा प्रकारे उडवाउडवीचे उत्तर देणारे पोलीस सर्वसाधारण जनतेशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक)

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने येथील छोट्या व्यावसायिकांना याविषयी विचारले असता त्यांनी, येथे अडचणच होते; मात्र याविषयी कुणी काही बोलत नाही’, असे सांगितले. विशेष म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असल्यामुळे पादचारी मार्गावर बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस असतात. पोलीस असतांना त्यांच्या समक्षच हा पादचारी मार्ग पूर्णपणे अडवून ठेवला जात आहे. विधीमंडळाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर काही पावलांवरच हा सर्व प्रकार चालू आहे.

संपादकीय भूमिका

  • असे पोलीस काय कामाचे ? याकडे वरिष्ठ अधिकारी आणि सरकार लक्ष देतील का ?
  • धर्मनिरपेक्ष देशात अशा प्रकारे एकाच धर्माच्या धार्मिक सणासाठी सार्वजनिक रस्ता अडवून समस्त जनतेला वेठीस धरणे कितपत योग्य ? अशा प्रकारची सूट कधी हिंदूंना मिळते का ?